कल्याण : कल्याणमध्ये वर्दळीच्या रस्त्यांवर वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या, तसेच, या वाहनांमुळे सकाळच्या वेळेत पालिका सफाई कामगारांना वाहने उभी असलेल्या भागाची सफाई करता येत नाही. त्यामुळे अशी वाहने उभी करणाऱ्या वाहन मालकांवर कल्याण डोंबिवली पालिकेचा घनकचरा विभाग आणि कल्याण वाहतूक विभागातर्फे संयुक्तपणे दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.

पहिल्या पाहणी दौऱ्यात १५ वाहन मालकांवर कारवाई करण्यात आली. दुर्गाडी किल्ला येथील दुर्गा चौक, लालचौकी, सहजानंद चौक ते शिवाजी चौक हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. सर्व प्रकारची जड अवजड, हलकी वाहने या रस्त्यांवरून धावतात. लालचौकी ते आधारवाडी, गोविंदवाडी बाह्यवळण रस्त्यांवरून सर्व प्रकारची वाहने धावतात. या वर्दळीच्या रस्त्यावर दुतर्फा मोटार, ट्रक सारखी वाहने उभी करून ठेवली जातात. अनेक वेळा या वाहनांमुळे या रस्त्यांवर वाहन कोंडी होते. कोंडी झाल्यानंतर या वाहनांचे मालक परिसरात नसतात. त्यामुळे ही वाहने आहे त्या जागेवरून हटविणे वाहतूक पोलिसांना अवघड होते. या भागातील वाहन कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची दमछाक होते.

हेही वाचा : कल्याणमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा

या वर्दळीच्या रस्त्यांवर अनेक वाहने अनेक महिने एकाच जागी उभी आहेत. ही वाहने एकाच जागी अनेक महिने उभी राहत असल्याने सकाळच्या वेळेत पालिका सफाई कामगारांना वाहने उभी असलेल्या भागाची सफाई करता येत नाही. अशा वाहनांखाली कचरा साचून रहातो. त्यामुळे पालिकेच्या घनकचरा विभागाची अशा वाहनांमुळे डोकेदुखी वाढली आहे.

ही वाहने मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरून हटविण्याची मोहीम गेल्या दोन दिवसांपासून कल्याण डोंबिवली पालिका घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, कल्याण वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांनी सुरू केली आहे. रस्त्यांवरील वाहनांचे क्रमांक पाहून त्यांच्या वाहन मालकांचा शोध घेऊन वाहतूक विभाग, पालिकेने अशा वाहन मालकांना कारवाईच्या नोटिसा पाठविण्यास सुरूवात केली आहे. ही वाहने तातडीने वर्दळीच्या रस्त्यावरून हटविण्याच्या सूचना केल्या आहेत. वाहनतळ सोडून सार्वजनिक वर्दळीच्या रस्त्यावर वाहन उभे केल्याने आणि स्वच्छतेमध्ये बाधा आणल्याने पालिकेने एकूण १५ वाहन मालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. अनेक वाहन मालकांनी वाहतूक पोलीस आणि पालिकेच्या नोटिशीला प्रतिसाद दिलेला नाही. त्यांच्यावर आरटीओच्या माध्यमातून कारवाई केली जाणार आहे, असे पालिका, वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले. अशाप्रकारची मोहीम डोंबिवलीतील वर्दळीच्या रस्त्यावर राबविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

हेही वाचा : बदलापूर: ‘त्या’ माध्यम प्रतिनिधीला जामीन मंजूर, वकील संघटनांचा पुढाकार, अन्य आरोपींनाही जामीन

सार्वजनिक रस्त्यावर वाहने उभी करून स्वच्छता करण्यात अडथळा निर्माण करणाऱ्या आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहन मालकांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. वाहतूक विभाग आणि पालिका घनकचरा विभाग यांची ही संयुक्त कारवाई मोहीम सुरूच ठेवण्यात येणार आहे.

अतुल पाटील (उपायुक्त, घनकचरा विभाग)