कल्याण : खासगी शिकवणीवरून सुटल्यानंतर रिक्षेतून घरी जाताना एका रिक्षा चालकाने रिक्षेत बसलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीची छेड काढली. रिक्षा चालक आपल्याशी गैरवर्तन करत आहे याची जाणीव झाल्यावर विद्यार्थिनीने धावत्या रिक्षेमधून बाहेर उडी मारून स्वताचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. रिक्षा चालकाने या विद्यार्थिनीशी अश्लिल कृत्य करण्याच्या इराद्याने तिचा पाठलाग करून तिला शिवागाळ केली.

मुलीने हा प्रकार घरी आई, वडिलांना सांगताच, आईच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी रिक्षा चालका विरुध्द गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तातडीने गोपाळ मुदलियार या रिक्षा चालकाचा शोध घेऊन त्याला अटक केली. गेल्या काही महिन्यांपासून मुलींबाबत सार्वजनिक ठिकाणी होत असलेल्या गैरवर्तनाबाबत पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

हेही वाचा : बदलापूर: ‘त्या’ माध्यम प्रतिनिधीला जामीन मंजूर, वकील संघटनांचा पुढाकार, अन्य आरोपींनाही जामीन

पोलिसांनी सांगितले, कल्याण पूर्व भागात राहत असलेली एक अल्पवयीन विद्यार्थिनी दररोज सकाळी खासगी शिकवणीला जाते. घरी येताना ती खासगी शिकवणी वर्गा बाहेर मिळणाऱ्या रिक्षेतून घरी येते. सोमवारी ही विद्यार्थिनी घरी येण्यासाठी एका रिक्षेत बसली. रिक्षा सुरू झाल्यानंतर काही वेळाने रिक्षा चालक गोपाळ विद्यार्थिनीकडे तिचा मोबाईल क्रमांक मागू लागला. मुलीने त्यास नकार दिला. त्यानंतर रिक्षा चालकाने मुलीची छेड काढण्यास सुरूवात केली.

हेही वाचा : कल्याण मध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा अटकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिक्षा चालक आपल्याशी गैरवर्तन करत आहे याची जाणीव झाल्यावर मुलीने चालकाला रिक्षा थांबविण्यास सांगून आपण रिक्षेतून उतरत असल्याचे सांगितले. चालक गोपाळ याने तिचे न ऐकता उलट रिक्षा जोराने चालवली. रिक्षा चालक आपले अपहरण करत आहे, याची जाणीव झाल्यावर मुलीने धावत्या रिक्षेमधून उडी मारली. ती जमिनीवर पडली.तशीच उठून तिने घराच्या दिशेने पळ काढला. रिक्षा चालकाने तशात तिचा पाठलाग करून तिला शिवीगाळ केली. घरी आल्यावर मुलीने घडला प्रकार पालकांना सांगितला. त्यांनी तातडीने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गु्न्हा दाखल करून रिक्षा चालकाचा शोध घेतला. त्याला रिक्षा वाहनतळावरून अटक केली.