ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील महामार्ग, त्यावरील उड्डाण पुलांवर पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांबरोबर जाहीरात फलकांचा मुद्दा गाजत असतानाच, महामार्गालगत उभारण्यात आलेल्या आता डिजीटल होर्डींगचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या होर्डींगवरील एलइडी जाहीरातींचे प्रकाशमान हे ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याची बाब ठाण्यातील दक्ष नागरिकांनी केलेल्या मापनातून पुढे आली असून यामुळे वाहनचालकांच्या दृष्टींवर परिणाम होऊन अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, चौक अशा सर्वच ठिकाणी जाहिरात फलक उभारण्यात आलेले आहेत. शहरातील महामार्ग, त्यावरील उड्डाण पुलांवरही जाहीरात फलक उभारण्यात आलेले आहेत. मुंबई तसेच पुणे शहरात जाहीरात फलक कोसळून नागरिकांना जीव गमावावा लागला होता.
या घटनेनंतर ठाणे महापालिकेने असे अपघात टाळण्यासाठी शहरातील जाहिरात फलकांची तपासणी केली होती. तसेच या फलकांसाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी सांगड्याचे संरचनात्मक परिक्षण अहवालही संबंधित कंपन्यांकडून घेतले आहेत. असे असतानाच, आता शहरात उभारण्यात आलेल्या काही एलइडी फलक असून त्यावर चलचित्र स्वरुपात जाहीरात प्रसारित करण्यात येत आहेत. परंतु या जाहिरातबाजीसाठी ठरवून दिलेल्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे समोर आले आहे.
काय सांगतो नियम
वाहनचालकांच्या डोळ्यावर तिरीप येईल इतक्या प्रखरतेची रोषणाई केलेला जाहिरात फलक प्रदर्शित करण्याची परवानगी दिली जाणार नाही. प्रकाशमानाची मर्यादा ही १ सीडी- सीएम (कैन्डेला स्टेराॅयडयीन पर स्क्वेअर मीटर) एवढ्या प्रभाव मर्यादेपेक्षा अधिक नसावी. रात्री ११ नंतर रोषणाई चालू ठेवण्यात येऊ नये. दृकश्राव्य किंवा चलचित्र डिजीटल जाहिरातींना परवानगी दिली जाणार नाही. एलइडी दर्शक पट (डिस्प्ले) हे केवळ स्थिर चित्री असावेत. किमान दर १० सेकंदानंतर प्रतिमांमध्ये होणारा बदल अनुज्ञेय असेल, असे महत्वाचे नियम आहेत. मात्र, त्यापैकी काही नियमांची पायमल्ली होत असून त्याकडे पालिकेचे दुर्लक्ष होताना दिसून येते.
ठाणे येथील कोपरी पुलाजवळ लावण्यात आलेल्या डिजीटल होर्डींग बंद असताना त्याचे प्रकाशमान यंत्राद्वारे मोजण्यात आले, त्यावेळी त्याचा प्रकाशमान १८ लुक्स (१ सीडी- सीएम म्हजेच १ लुक्स) इतका होता. त्यानंतर होर्डिंग सुरू होताच त्यावरील प्रकाशमान मोजण्यात आला असता, तो २०० लुक्सच्या पुढे होता. हा प्रकाशमान ठरवून दिलेल्या नियमापेक्षा जास्त आहे, असे ठाण्यातील दक्ष नागरिक अजय जया यांनी सांगितले. जास्त प्रकाशमानामुळे वाहनचालकांना त्रास होऊन अपघात होऊ शकतो. तसेच रस्ते सुरक्षेसाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात असून त्या तुलनेत डिजीटल जाहीरातबाजीतून त्या खर्चाच्या एक टक्काही उत्पन्न पालिकेला मिळत नाही. मग, डिजीटल जाहिरातबाजी कुणासाठी सुरू आहे, असा प्रश्नही जया यांनी उपस्थित केला.
कुठे फलक आहेत?
ठाणे शहरात एकूण १३ ठिकाणी डीजीटल जाहिरात फलक उभारण्यास पालिकेने परवानगी दिली आहे. त्यामध्ये काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, बी केबीन, हरि निवास, तलावपाळी, गणेश दर्शन, माजिवाडा, तीन हात नाका, ठाणे शहरातील उड्डाण पुलांच्या खाली, आनंदनगर, कापुरबावडी, मानपाडा, तीन पेट्रोल पंप या होर्डिंगचा समावेश आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.
डिजीटल जाहीरात होर्डींगवरील प्रकाशमान हे प्रमाणापेक्षा जास्त असल्याबाबत अद्याप लेखी तक्रार आलेली नाही. याबाबत काही तक्रार असल्यास आमच्या विभागाकडे करावी. तसेच आमच्या विभागामार्फतही अशा फलकांची तपासणी करण्यात येईल.- दशरथ वाघमारे, सहाय्यक आयुक्त, जाहीरात विभाग, ठामपा
डीजीटल होर्डिंग दूर अंतरावर असतील तर, त्याचा फारसा परिणाम होत नाही. मात्र, ते जवळ अतंरावर असतील तर, त्याच्या प्रकाशमानामुळे डोळ्यांवर अंधारी येऊ शकते. त्यामुळे अशा होर्डींगचा वापर शक्यतो टाळला पाहिजे. – डाॅ. प्रसन्नाकुमार देशमुख, नेत्रचिकित्सक