ठाणे : पूर्व येथील कोपरी गावातील शेलार हाऊस, जवळील एका विहिरीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. हेमंत जगन्नाथ शेलार (अंदाजे ६३) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते डोंबिवलीतील रहिवासी असून शनिवारी सायंकाळी ते ठाण्यातील कोपरी गावात राहणाऱ्या भावाकडे आले होते. परंतु, त्यानंतर ते रात्रीपासून बेपत्ता होते.
रविवारी सकाळी ८:३० च्या सुमारास कोपरी गावातील शेलार हाऊस जवळ असलेल्या विहिरीत त्यांचा मृतदेह तरंगताना दिसून आला. या घटनेची माहिती मिळताच कोपरी पोलीस, अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तसेच ठाणे महापालिकेची शववाहीका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.
पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय येथे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात पुढील तपास सुरु आहे.