ठाणे : आता शेवटचे अस्र तुमच्याकडे उरलंय, ते म्हणजे हिंदू विरूद्ध मुस्लीम. त्याचा वापर करा. पण, देश आता भुलणार नाही. तुमची जादू संपलेली आहे, असे विधान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. वाढत्या महागाई पूर्ण देश त्रस्त असताना त्यावर उपाय शोधण्याऐवजी लोकांची दिशाभूल करण्यासाठी आता जर तुम्ही, या पातळीवर येत असाल की, लोक काय खातात, शाकाहार की मांसाहार? याचा अर्थ दहा वर्षांत तुम्ही काहीच करू शकला नाहीत. आता शेवटचे अस्र तुमच्याकडे उरलंय, ते म्हणजे हिंदू विरूद्ध मुस्लीम. त्याचा वापर करा. पण, देश आता भुलणार नाही. तुमची जादू संपलेली आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

भारतातील सर्वच प्रश्न सुटले आहेत, अशा अविर्भावात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या प्रचार सभांमधून सांगत आहेत. इथे एकवेळच्या जेवणाची मारामारी आहे. बेरोजगारीमुळे युवक हैराण झाले आहेत. महागाईने उच्चांक गाठल्याने संसार मोडून पडलाय. चीनच्या अतिक्रमणामुळे ईशान्य भारताला असुरक्षित वाटत आहे. डाॅलरच्या तुलनेत कधी नव्हे एवढा रूपया घसरला आहे. एकंदरीत भारताची अर्थव्यवस्था खड्ड्यात गेली आहे. हे सर्व यक्षप्रश्न समोर असताना भारतात फक्त एकच प्रश्न उरला आहे तो म्हणजे, हिंदू विरूद्ध मुस्लीम पहिले म्हणे काय तर, काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लीमधार्जिणा आहे. ज्या पाच गॅरेंटी काँग्रेसने दिल्या आहेत. त्या भारताच्या नागरिकांना दिल्या आहेत. पहिल्या वर्षी तीस लाख नोकऱ्यांचे वचन दिले आहे ते कोण्या एका समाजासाठी दिलेले नसून समस्त भारतीयांसाठी दिलेले आहे, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : डोंबिवलीतील शिक्षण संस्था चालकाची मंत्रालयातील शिक्षण विभागातील मध्यस्थाकडून फसवणूक

सर्वात कहर म्हणजे, काल नरेंद्र मोदी यांनी मांसाहार विरूद्ध शाकाहार या पातळीवर प्रचार आणून ठेवला. आम्ही आधीच सांगितले होते की, या देशाचे शाकाहारीकरण करणे हा त्यांचा एक छुपा अजेंडा आहे. आज त्यांनी तो उघड केला की “मांसाहार करताना इतर लोकांच्या भावना दुखावल्या जातात हे इतर लोकांना समजत कसे नाही”. आमच्या इथे तर बहुतेक देवदेवतांना मांसाहाराचा नैवेद्य दाखविला जातो, ही महाराष्ट्रातील पूर्वापार चालत आलेली प्रथा-परंपरा आहे. मग, तुळजाभवानी असो, यमाई असो, वणीची सप्तशृंगी असो, माहूरगडची रेणुकादेवी असो, मांढरदेवी अशी अनेक देवस्थाने आहेत. खंडोबा-भैरोबाला आपण नैवेद्य दाखवतो. त्यामुळे मराठी जनतेला हे काहीच नवीन नाही. गणेशोत्सवात गौरीला माश्यांचा नैवेद्य दाखवणे, ही कोळी समाजाची परंपरा आहे. असे असताना शाकाहार-मांसाहारावर राष्ट्रीय निवडणुकांमध्ये बोलणे, हे मोदींना न शोभणारे आहे. तुम्ही देशाचा कसा विकास केला, देशातील किती बेरोजगारांना नोकऱ्या दिल्यात. देशाची आर्थिक स्थिती कशी उंचावलीत, किती बेघरांना घरे उपलब्ध करून दिलीत. ज्या ज्या शपथा घेतल्या होत्या , त्या किती पाळल्यात. जी-जी आश्वासने दिली होती, त्यांची कितपत पूर्तता केलीत, असे प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.