ठाणे – ग्रंथालय व्यवस्थापनातील नविन पद्धती, ग्रंथालय अनुदान निगराणी प्रणाली, तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या अनुषंगाने असलेल्या कायद्यांबाबत ग्रंथालयांना विस्तृत माहिती मिळावी या उद्देशाने ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाच्यावतीने ठाण्यात ग्रंथालय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा बुधवारी, १६ जुलैला सकाळी १०. ३० वाजता ठाण्यातील जिल्हा परिषद कार्यालयासमोरील मराठी ग्रंथ संग्रहालयात होणार आहे.
राज्यातील अनेक शासकीय ग्रंथालयांना आधुनिक तंत्रज्ञानाची पूर्ण माहिती नसल्याने अनुदान व्यवस्थापन, लेखा प्रक्रियांचे पालन, तसेच धर्मादाय आयुक्तांच्या नियमांची अंमलबजावणी यामध्ये अडचणी येत असतात. ग्रंथालय अनुदान निगराणी प्रणाली ही अशी डिजिटल प्रणाली आहे जी शासनाच्या अनुदान प्रक्रियेतील पारदर्शकता, गती आणि नियंत्रण वाढवण्यासाठी वापरली जाते. मात्र, अनेक ग्रंथालय कर्मचारी आणि व्यवस्थापकांना या प्रणालीची सविस्तर माहिती नसते. त्याचप्रमाणे, धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे नियम आणि प्रक्रिया समजावून घेणेही सार्वजनिक संस्थांसाठी अत्यावश्यक आहे. याच उद्देशाने ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांसाठी ‘ग्रंथालय कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे. ही एक दिवसीय कार्यशाळा दोन सत्रांत पार पडणार आहे.
यातील पहिल्या सत्रात ‘ग्रंथालय व्यवस्थापन आणि ग्रंथालय अनुदान निगराणी प्रणाली (एलजीएमएस)’ याबाबत माहिती दिली जाणार आहे. ही माहिती देण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड यांची उपस्थिती असणार आहे. तर पहिल्या सत्रात ‘धर्मादाय आयुक्तांचा कार्यालय यांच्या लेखा व्यवस्थापनाबाबतच्या नियमावली आणि अंमलबजावणी’ याविषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. हे मार्गदर्शन सनदी लेखापाल शैलेश निपुणगे करणार आहेत. तर या कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात ‘सार्वजनिक संस्थांसाठी धर्मादाय आयुक्तांचे नियम आणि अंमलबजावणी’ या विषयावर ठाणे धर्मादाय कार्यालयाच्या उप धर्मादाय आयुक्त रूपाली पाटील या माहिती देणार आहेत. सकाळी १०.३० वाजल्यापासून या कार्यशाळेस सुरूवात होणार आहे. ठाणे, पालघरसह मुंबई उपनगर येथील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय सेवक आणि कार्यकर्ते यांच्या प्रत्येकी दोन प्रतिनिधींनी कार्यशाळेस उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
सार्वजनिक ग्रंथालयांना ग्रंथालय अनुदान निगराणी प्रणाली (एलजीएमएस) याच्या अनुषंगाने होणारा त्रास दूर व्हावा. तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या नियम आणि अधिनियमांच्या ज्या अपेक्षा आहेत ते पुर्ण करण्यात ग्रंथालये कमी पडू नये. त्यांची नियमित कामे सुरळीत पार पडावी यासाठी, मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित केली आहे. – चांगदेव काळे, अध्यक्ष, ठाणे जिल्हा ग्रंथालय संघ