Premium

गणेशोत्सवाच्या देखाव्यातून विविध सामाजिक संदेश; घरोघरी गणेशोत्सवासाठी चांद्रयान मोहिमेची आरास

यंदा घरगुती आरासमध्ये चंद्रयान मोहिमेचे देखावे उभारण्यात आलेले असून असे देखावे उभारण्याची संख्या मोठी असल्याचे दिसून येते.

ganeshotsav 2023 thane, thane ganeshotsav 2023, ganesh mandal decoration
गणेशोत्सवाच्या देखाव्यातून विविध सामाजिक संदेश; घरोघरी गणेशोत्सवासाठी चांद्रयान मोहिमेची आरास (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

ठाणे : सावर्जनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदाही सामाजिक संदेश देण्याबरोबरच पर्यावरणपुरक आरास करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. कचरा वर्गीकरण, तृतीयपंथी समाजाचा आक्रोश समस्या, बदलती तरुण पिढी अशा विविध विषयांवर भाष्य करत मंडळांनी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय, चांद्रयान मोहिम आणि ३५० वा शिवराज्यभिषेक सोहळा अशा महत्वाच्या घटनांचे देखावे मंडळांनी साकारले आहेत. तर, अनेक मंडळांनी पर्यावरणपुरक आरास केली आहे. यंदा घरगुती आरासमध्ये चंद्रयान मोहिमेचे देखावे उभारण्यात आलेले असून असे देखावे उभारण्याची संख्या मोठी असल्याचे दिसून येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणपतीची आरास व सजावट करण्यासाठी थर्मोकोलचा वापर केला जातो. परंतु थर्मोकोल हे पर्यावरणासाठी घातक आहे. यामुळे गणपतीची आरास करताना थर्मोकोलचा वापर टाळून पर्यावरणपुरक आरास करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून दरवर्षी करण्यात येते. त्यास आता नागरिकांकडूनही प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. घरगुती तसेच काही सार्वजनिक मंडळांकडून पर्यावरणपूरक सजावट केली जात आहे. साड्या, कागद, पुठ्ठा, कापड, पेपर ग्लास असे पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करुन आरास केली आहे. तर, काही मंडळांनी चलचित्र आणि प्रोजेक्टरद्वारे सामाजिक संदेश देणारे देखावे साकारले आहेत. वागळे इस्टेट येथील श्रीनगर परिसरात असलेल्या बाळ मित्र मंडळाने यंदा बदलती तरुण पिढी या विषयावर प्रोजेक्टरवर सादरीकरण केले आहे.

हेही वाचा : ठाणेकरांची घराजवळच गणेश मुर्ती विसर्जनास पसंती, दीड दिवसांच्या १३,९५५ गणेश मूर्तींचे विसर्जन, कृत्रिम तलाव व विशेष टाकीला प्राधान्य

यामध्ये पारंपारिक वर्षानुवर्ष सुरु असलेल्या रुढी – परंपरा, संस्कृती आहे, त्याचा तरुण पिढीला विसर पडत आहे. असे होऊ नये, यासाठी आपल्या रुढी परंपरा जपल्या पाहिजे, असा संदेश देण्यात आला आहे, अशी माहिती मंडळाचे सदस्य समीर सावंत यांनी दिली. तर, अलिकडे ह्रदयाशी निगडित आजार उद्भवू लागले आहेत, यामध्ये तरुण पिढीचे ही प्रमाण जास्त आहे. यासाठी आपल्या ह्रदयाची काळजी कशी घेतली पाहिजे, याची माहिती अनेकांना नसते. याबाबत जनजागृती करणारा देखावा कोर्ट नाका येथील पोलीस मुख्यालय प्राथमिक शाळा गणेशोत्सव मंडळाने साकारला आहे. यंदा कोपरी भागातील गांधीनगर परिसरात असलेल्या शिवसम्राट मित्र मंडळाने कचऱ्याचे वर्गीकरण या विषयावर देखावा सादर केला आहे. यामध्ये ओला कचरा, सुका कचरा वेगळा करावा तसेच ई- कचऱ्याचा वापर पुन्हा कसा करता येईल याची माहिती चलचित्राच्या माध्यमातून देण्यात येत आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष भास्कर गाडेकर यांनी दिली.

हेही वाचा : पावसाच्या धारात घामाच्याही धारा! ऊन पावसाचा लपंडाव, गणेशभक्तांची तारांबळ

महागिरी येथील एकविरा मित्र मंडळाने आनंदाच्या शोधात या विषयावर चलचित्राचा देखावा उभारला आहे. यामध्ये आनंद आपल्या आजूबाजूच्या गोष्टीत असतो, परंतू आपण तो कसा गमावतो. त्यामुळे छोट्याछोट्या गोष्टीचाही आनंद घ्यावा असा संदेश या मंडळामार्फत देण्यात आला आहे. गोकुळनगर येथील जय भवानी मित्र मंडळाने तृत्तीय पंथी हे देखील समाजाचे घटक आहेत, त्यांच्याकडे माणुसकी या नात्याने बघा असा संदेश देणारा देखावा साकारला आहे. पडवळनगर भागातील जयभवानी सार्वजनिक उत्सव मंडळाने पुठ्ठ्यांचा वापर करुन शिवराज्याभिषेक सोहळा साकारला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In thane most of the ganesh mandals decoration theme is chandrayaan 3 for ganeshotsav 2023 also gives social message to new generation css

First published on: 21-09-2023 at 17:27 IST
Next Story
ठाणेकरांची घराजवळच गणेश मुर्ती विसर्जनास पसंती, दीड दिवसांच्या १३,९५५ गणेश मूर्तींचे विसर्जन, कृत्रिम तलाव व विशेष टाकीला प्राधान्य