ठाणे : राज्यात आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरील चेहऱ्यावरून खलबत सुरू असताना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदाराने मात्र उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी पाहायचे आहे असे विधान केले. त्यांचे हे विधान समाजमाध्यमांवर सध्या प्रसारित होत आहे.

भिवंडी लोकसभेत भाजपचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सुरेश म्हात्रे ( बाळ्या मामा) निवडून आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने भिवंडी तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रात भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास बाळ्या मामा हे मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली.

हेही वाचा : डोंबिवलीतील बेकायदा राधाई भुईसपाट करण्यास न्यायालयाची दोन आठवड्यांची मुदत

बाळ्यामामा नेमके काय म्हणाले

भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात उद्ध‌व ठाकरे साहेब जो उमेदवार देतील. त्या उमेदवाराचा प्रामाणिकपणे मी प्रचार करेल. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलो तरीही मी अंत:करणाने सांगतो की पुन्हा एकदा उद्‌धव साहेबांना त्या खुर्चीवर बघायचे आहे. ही सर्वांची इच्छा आहे असेही ते म्हणाले.