ठाणे : येथील कोलशेत भागात उभारण्यात आलेल्या ‘नमो सेंट्रल पार्क’मध्ये शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने परिसरातील रस्त्यांवर वाहनांचा भार वाढून कोंडी होत आहे. त्याचा फटका परिसरातील नागरिकांना बसू लागल्याने वाहतूक पोलिसांनी आता शनिवार आणि रविवार या दिवशी येथील वाहतूक मार्गात प्रयोगिक तत्वावर मोठे बदल लागू केले आहेत. हि वाहतूक शहराबाहेरून म्हणजेच बा‌ळकुम येथून भिवंडीकडे जाणाऱ्या मार्गावरील दोस्ती वेस्ट काॅँन्ट्री या प्रकल्पाजवळील पर्यायी मार्गावरून वळ‌विण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाण्यातील नागरिकांना हक्काचे पार्क मिळावे यासाठी पालिकेने बांधीव हस्तांतरण विकास हक्काच्या माध्यमातून कोलशेत भागात नमो सेंट्रल पार्क हे उद्यान विकसित केले आहे. या सेंट्रल पार्कमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. पर्यटकांच्या वाहनांचा भार वाढल्याने कोलशेत, ढोकाली आणि हायलँड भागात वाहतुक कोंडी होत आहे. त्याचा फटका या भागात वास्तव्य करणाऱ्या हजारो नागरिकांना बसू लागला आहे. या कोंडीमुळे परिसरात राहणारे नागरिक घराबाहेर पडणे टाळू लागले आहेत. या कोंडीबाबत नागरिकांकडून नाराजीचा सूर उमटू लागताच वाहतूक पोलिसांनी या भागातील कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पाऊले उचलली आहेत.

हेही वाचा : कल्याण जवळील मलंगगडाच्या पायथ्याशी गुटख्याचा कारखाना, सात लाखांच्या गुटख्यासह तीन जण अटकेत

पार्क परिसरातील वाहतूक मार्गात शनिवार आणि रविवार या दिवशी प्रयोगिक तत्वावर मोठे बदल लागू करण्यात आले असून त्यासंबंधीची अधिसुचना ठाणे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डाॅ. विनयकुमार राठोड यांनी काढली आहे. यानुसार, कापुरबावडी सर्कल येथून येणारी वाहने बाळकुम नाका सिग्नल येथून दादलानी पार्ककडे जाणाऱ्या चौकातून ठाण्याहून भिवंडीकडे जाणाऱ्या वाहिनीवरील दोस्ती वेस्ट कॉन्ट्री प्रकल्पाच्या प्रवेशद्वारातून पार्कच्या दिशेने जातील. याच मार्गे कळवा- साकेत येथून येणारी वाहने पार्कच्या दिशेने जातील. काल्हेर-कशेळी-भिवंडी मार्गे येणारी वाहने दादलानी पार्क चौकातून वळण घेऊन ठाणे-भिवंडी वाहिनीवरून पुढे दोस्ती वेस्ट कॉन्ट्री प्रवेशद्वारातून पार्कच्या दिशेने जातील. हि अधिसूचना पोलीस वाहने, अग्निशमन, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर, प्राणवायु आणि गॅस वाहने, इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही. ३० दिवसांच्या प्रायोगिक तत्वावर हे बदल लागू करण्यात आलेले असून पार्कमध्ये जाणाऱ्या नागरिकांनी या मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिस उपायुक्त डाॅ. विनयकुमार राठोड यांनी केले आहे.

हेही वाचा : ठाणे स्थानकातील फलाट रुंदीकरणाच्या हालचालींना वेग

‘नमो द सेंट्रल पार्क’ मध्ये शनिवार आणि रविवार यासह सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. पर्यटकांची वाहनांने उभी करण्यासाठी वाहनतळाची सुविधा असून त्याठिकाणी २०० ते २५० वाहने उभी करण्याची क्षमता आहे. वाहनतळात जागा उपलब्ध झाली नाही तर, पर्यटक परिसरातील रस्त्यावर वाहने उभी करतात. त्याची संख्या दोन ते अडीच हजार इतकी आहे. या पार्किंगमुळे नंदीबाबा मंदिर चौक, ढोकाळी नाका, पार्कसिटी, लोढा आमारा आणि कोलशेत गांव या मार्गावर वाहतुक कोंडी होते. तसेच कल्पतरू गृहसंकुलामध्ये रहिवाशी राहण्यासाठी आल्यानंतर वाहनांची संख्या २२०० इतकी होणार आहे. तसेच ब्रॉडवे ऑटोमोबाईल्स पेट्रोल पंप ते विहंग इन हॉटेल या सेवा रस्त्यावर मलवाहिनी टाकण्यात येणार असून त्याचबरोबर मलजोडणीची कामे करण्यात येणार आहे. यासाठी खोदकाम करण्यात येणार असल्याने हा रस्ता पूर्णपणे बंद करावा लागणार आहे. यामुळे परिसरात कोंडी होण्याची शक्यता आहे. या सर्वाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी येथील मार्गात वाहतूक बदल लागू केले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane traffic route changes in namo central park area for saturday sunday css
First published on: 01-03-2024 at 15:39 IST