ठाणे: अयोध्यामध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या सोमवारी साजरा केला जाणार आहे. देशात राम भक्तांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहेत. असे असताना या सोहळ्याच्या नावाने गैरफायदा घेत काही सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाईन फसवणूकीचा प्रयत्न सुरू झाला आहे. राम मंदिरासाठी देणगी, अयोध्येत विशेष दर्शन (व्हीआयपी), पुढील तीन महिने मोफत रिचार्ज असे फसवणूकीचे संदेश नागरिकांच्या मोबाईलवर आणि समाजमाध्यमांवर धडकू लागले आहेत. यातून नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. राज्यात याप्रकरणी फसवणूकीचे गुन्हे दाखल नसले तरी नागरिकांनी अशा लिंक मोबाईलमध्ये सामाविष्ट करून स्वत:ची वैयक्तिक माहिती भरू नये असे आवाहन राज्याच्या सायबर विभागाने केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अयोध्येत २२ जानेवारीली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन आणि मुर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. या निमित्ताने संपूर्ण देशभरात विविध राजकीय पक्ष, हिंदुत्त्ववादी संघटना, संस्थांकडून कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. राम भक्त देखील २२ जानेवारी किंवा त्यानंतर अयोध्यामध्ये जाण्यास उत्सुक दिसत आहेत. देशात राममय वातावारण झाले असताना त्याचाच गैरफायदा आता सायबर गुन्हेगारांकडून केला जाऊ लागला आहे. गेल्याकाही दिवसांपासून नागरिकांच्या मोबाईल क्रमांकावर, समाजमाध्यमांवर राम जन्मभूमीसाठी देणगीसाठी ऑनलाईनरित्या पैशांच्या मागणीचे संदेश पसरविले जात आहेत. तसेच तुम्ही राम मंदिरात विशेष दर्शन घेण्यासाठी विजयी झाला आहात, त्यानंतर पुढील संदेशात विशेष दर्शनासाठी लिंकमध्ये प्रवेश करण्यास सांगितले जात आहे.

हेही वाचा… रामाचा उत्सव घरोघरी साजरा होणार; दीपोत्सवानिमित्त कंदिलांच्या मागणीत वाढ

तर काही मोबाईलधारकांच्या मोबाईल क्रमांकावर राम मंदिर उद्घाटनानिमित्ताने तीन महिने मोफत मोबाईल रिचार्ज असे संदेश प्रसारित होत असून मोफत रिचार्जसाठी एक लिंक दिली जात आहे. देशातील विविध राज्यांमध्ये हे प्रकार समोर आले आहेत. तर महाराष्ट्रात अद्याप नागरिकांची अशाप्रकारे फसणूकीच्या तक्रारी आल्या नसल्याची माहिती राज्य सायबर विभागाकडून देण्यात आली आहे. परंतु नागरिकांनी अशा संदेशांवर विश्वास ठेवून स्वत:ची वैयक्तिक माहिती, बँकेचा तपशील त्यामध्ये भरू नये असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

फसवणूक कशी होऊ शकते ?

संदेशासोबत जोडण्यात आलेल्या लिंकमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यात तुमची वैयक्तिक, बँक खात्याविषयीची माहिती मागविली जाते. भावनेच्या भरात नागरिक त्या लिंकमध्ये प्रवेश करून माहिती भरू शकतात. त्यानंतर तुमच्या बँकखात्यातील रक्कम सायबर गुन्हेगार काढून घेऊ शकतात अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

राज्यात अद्याप फसवणूकीच्या तक्रारी दाखल नाहीत. परंतु इंटरनेट वापरकर्त्यांनी अशा प्रकारे संदेश आल्यास तो व्यवस्थित तपासून घेणे आवश्यक आहे. संदेशाखाली येणाऱ्या लिंकमध्ये प्रवेश करू नये. पूर्वी करोनाकाळातही लसीकरणाच्या नावाखाली फसवणूक झाली होती. त्यामुळे नागरिकांनी अशा संदेशाकडे दूर्लक्ष करावे. – यशस्वी यादव, विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र सायबर विभाग.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inauguration of a ram temple ayodhya in the name of a special darshan donation fraud could happen vigilance from the police dvr