ठाणे : गेल्या ३५ वर्षांत असे किती लोक आले आणि गेले. त्यांची नावेही आठवत नाहीत. आजही मी शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. मी अशी कोणतीही कामे करत नाही ज्यामुळे आयकर किंवा सीबीआयचा छापा पडेल. त्यामुळे माझे चित्रीकरण प्रसारित करायचा असेल तर करा, मी सामोरे जाण्यास तयार असल्याचे आव्हान वन मंत्री गणेश नाईक यांनी शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांना दिले. जर आयुष्यात चुका केल्या असतील तर त्याचे पाप मी माझ्या खांद्यावर घेऊन जाईल असेही ते म्हणाले.

ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे सोमवारी वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार आयोजित केला होता. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी गणेश नाईक यांच्यावर टीका केली होती. नाईक यांच्या नालायकपणाचे चित्रीकरण राज्यातील चित्रपटागृहात प्रदर्शित करु असा इशारा दिला होता. त्यास नाईक यांनी प्रत्युत्तर दिले. न्यायाधीशांच्या घरातही पैसे सापडतात, मग न्याय मागायचा कोणाकडे? हे लोकांचे दुर्दैव आहे. जर मी भ्रष्टाचारी असेल, तर माझ्यावरील प्रकरणे बाहेर काढा. माझ्यावर टीका करणाऱ्यांना मी दोष देत नाही. जो आपले कर्तव्य पार पाडत नाही, तो नालायकच आहे. मी काम करत नसेल तर मी सुध्दा नालायकच ठरु शकतो, असे नाईक म्हणाले.

प्रशासनात दहा टक्के लोक नालायक आहेत. मी येथे कोणावर मेहेरबानी करायला आलो नाही. मी गरीब जनतेचे अश्रू पुसायला आलो आहे. माझे हात स्वच्छ आहेत आणि मनही स्वच्छ आहे. जे नालायक आहेत आणि शक्तीचा दुरुपयोग करून गरीबांच्या आयुष्याचा सत्यानाश करतात. त्यांना थांबवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. प्रशासन १० टक्के तर राजकारणात त्यापेक्षा काही टक्के अधिक नालायक लोक आहेत. माझ्याकडे दरबार भरविण्याची काही हौस नाही, पण जनतेला दिलासा देणारे काम या दरबारातून होत आहे. लोकांच्या तक्रारी येतात, त्यामुळे अधिकारी कामे जलदगतीने काम करतात. जर येथे कोणी येणार नसेल तर असा दरबार बंद करायला मला वेळ लागणार नाही असेही ते म्हणाले.

नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाविषयी नाईक यांनी भूमिका स्पष्ट केली. मला पूर्ण विश्वास आहे की या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.