ठाणे : कळवा आणि मुंब्रा परिसरातील तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महापालिका आयुक्तांना दसऱ्यापूर्वी समस्या सोडविण्याचा अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा त्यांना त्यांच्याच दालनात बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला. पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत नव्या इमारतींना ओसी, सीसी देऊ नका.” अशी मागणी त्यांनी केली आहे.
भाजपने कळव्यातील पाणीटंचाईविरोधात प्रभाग समितीवर मोर्चा काढत महिलांच्या सहभागाने मडकी फोडून निषेध नोंदवला. त्यापाठोपाठ बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा-कळव्यातील रहिवाशांसह ठाणे महापालिका मुख्यालयात धडक देत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. अधिकाऱ्यांच्या उडवाउडवीच्या उत्तरांवर संतप्त होत आव्हाड म्हणाले, “२००२ साली धरण मान्य झाले, पण भ्रष्टाचार व सत्ताधाऱ्यांच्या लोभापायी आजवर ते झाले नाही. कॉंक्रीटीकरणाच्या रस्त्यांवर २० ते ४० टक्के मिळतात, करोडो रुपये दिले जातात, पण धरण बांधायला निधी नाही. घोडबंदर रोडला पाणी नाही, शहरात कचऱ्याची भूमी नाही, वाहतूक कोंडीने लोक त्रस्त आहेत.
फायली दाबून ठेवल्या जातात
कळवा आणि मुंब्र्यातील नागरिकांना पाणी मिळावे म्हणून आम्ही अधिकाऱ्यांच्या हाता-पाया पडतो, पण त्यांना जाग येत नाही. सत्ताधाऱ्यांना सुद्धा पाणी प्रश्न सोडविण्याऐवजी मोर्चे काढण्याचे नाटक करावे लागत आहे. पाणी देणे ही शासनाची जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांकडे बैठका लावून समस्या सोडवावी, पण ना शासन लक्ष देते, ना अधिकारी. उलट फायली दाबून ठेवल्या जातात. असा आरोप आव्हाड यांनी केला.
निवडणुकीसाठी दिखावा
मुंब्रा-कळव्यातील रहिवाशांना मुद्दाम पाणी दिले जात नाही. हा एक राजकीय खेळ आहे. १० दशलक्ष लिटर पाण्याची फाईल महिन्यांपासून तयार आहे, तरी ती अद्याप मार्गी लागलेली नाही. उलट तयार नसलेल्या मेट्रोसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठाण्यात येतात, जी मेट्रो दोन वर्षांनी सुरू आहे, तिच्या चाचणीचा निवडणुकीसाठी दिखावा करतात, अशी टीका त्यांनी केली.
धरणासाठी पैसे नाहीत
२००२ साली धरण मान्य झाले होते, पण पैशाच्या लोभापायी आजतागायत काम झाले नाही. घोडबंदर रोडला पाणी नाही, पाऊस चांगला पडला तरी ठाण्यात पाणी नाही. आयुक्त फक्त पाहणी करतात आणि अधिकाऱ्यांना सांगतात, पण प्रत्यक्षात काही होत नाही. कॉंक्रीटीकरणाच्या रस्त्यावर २० ते ४० टक्के घेतले जातात, करोडो रुपये खर्च होतात, पण धरणासाठी पैसे नाहीत. शहरात कचरा व्यवस्थापनाची भूमी नाही, वाहतूक कोंडीमुळे नागरिक तासन्तास अडकतात, असे आव्हाड म्हणाले.
आयुक्तांना त्यांच्या दालनातच बंद करू
जोपर्यंत ठाण्यातील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत नव्या इमारतींना ओसी आणि सीसी मंजूर करू नये. तसेच सणसूतीचा काळ आहे. नवरात्र उत्सव सुरू आहे. आम्हाला कोणाला या काळात त्रास द्यायचा नाही. पण, कळवा आणि मुंब्रा येथील पाणी प्रश्न दसऱ्यापर्यंत सुटला नाही, तर ठाणे महापालिका आयुक्तांना त्यांच्या दालनातच बंद करू, असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे.