Ganeshotsav 2025 : कल्याण – १३१ वर्षाची परंपरा असलेल्या कल्याण मधील सुभेदारवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी गणपतीच्या मखरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज दरबाराचा देखावा उभा केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी भक्तगणांच्या रांगा लागल्या आहेत. श्रीराम सेवा मंडळाने यावर्षीही सुभेदारवाडा सार्वजनिक गणेशोत्सवाचे व्यवस्थापन केले आहे.
कल्याण शहरातील मानाचा आणि गावकीचा गणपती म्हणून सुभेदारवाडा गणेशोत्सवाचा मान आहे. स्वातंत्र्य लढयातील काही राष्ट्रपुरूषांनी दर्शनासाठी सुभेदारवाडा गणेशोत्सवाला यापूर्वी भेट दिली आहे. १३१ वर्ष सुभेदारवाडा गणेशोत्सवाची गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा आताही अखंडपणे सुरू आहे. श्रीराम सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रवीण शिंपी यांनी यावर्षीही अध्यक्ष पदाची धुरा सांंभाळली आहे. ऐतिहासिक, वास्तवदर्शी देखाव्यांना सुभेदारवाडा गणेशोत्सव मंडळात सर्वाधिक प्राधान्य दिले जाते.
गणेशोत्सवाचे औचित्य साधून दरवर्षी कल्याण शहरातील सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, संस्थात्मक, गायन अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ति, संस्थेला सुभेदारवाडा सार्वजनिक गणेशोत्सव शताब्दी पुरस्काराने सन्मानित केले जाते. गणेशोत्सवा बरोबर सामाजिक, प्रबोधनात्मक काम करण्याची सुभेदारवाडा गणेशोत्सव मंडळाची परंपरा जतन केली जात आहे.
मागील वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला साडे तीनशे वर्ष पूर्ण झाली. या संकल्पनेचा आधार घेऊन शिवाजी महाराजांच्या राज दरबाराचा देखावा यावर्षी मखरात उभारण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील सिंहासनापासून ते नगारखान्यापर्यंतचा संपूर्ण राज दरबार सुभेदारवाड्यात देखाव्याच्या माध्यमातून साकारण्यात आला आहे. ज्येष्ठ कला दिग्दर्शक संजय धबडे यांनी ही कलाकृती साकरली आहे.
आगामी वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हाच विषय घेऊन कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. येत्या गुरूवारी आणि शुक्रवारी सुभेदारवाडा येथे शिवकालीन नाणी आणि शस्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. गुरुवारी सुभेदारवाड्यात नवदुर्गा पुरस्काराचा कार्यक्रम होणार आहे, असे अध्यक्ष प्रवीण शिंपी यांनी सांगितले.