कल्याण – कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात सहकार्य आणि आरोपीला जामीन मंजूर करून घेण्यासाठी तक्रारदाराकडे तीन लाख रूपयांची लाच मागणारे आणि तडजोडीने या रकमेतील एक लाख २५ हजार रूपयांची लाच स्वीकारणाऱ्याला एका हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे पथकाने सोमवारी रंगेहाथ पकडले. याप्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्याला पथकाने ताब्यात घेतले आहे.
साहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम गंगाराम जोशी (५७), विजय वामन काळे (३८) अशी लाचखोरीच्या जाळ्यात अडकलेल्या पोलिसांची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संतोष नावलगी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली.
खडकपाडा पोलीस ठाण्यातील माहिती अशी, की एक ६७ वर्षाचे तक्रारदार यांच्या मुलाच्या विरूध्द खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी सहकार्य करावे म्हणून तक्रारदार प्रयत्नशील होते. हे प्रयत्न करत असताना या प्रकरणातील तपास अधिकारी साहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम जोशी यांनी तक्रारदार यांच्याकडे तीन लाख रूपये लाचेची मागणी केली. ही मागणी होताच तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील यांच्याकडे तक्रार केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची शनिवार, रविवार पडताळणी केली. त्यामध्ये जोशी तीन लाखाची लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. जोशी यांच्या सूचनेवरून हवालदार विजय काळे यांनी तक्रारदार यांची लाचेसंंदर्भात भेट घेतली आणि तडजोडीने दोन लाख रूपयांची मागणी पोलिसांनी केली. त्यानंतर ही रक्कम सव्वा लाख देण्याचे ठरले. सव्वा लाखाची तडजोड जोशी यांनी मान्य केल्यावर ही रक्कम सोमवारी जोशी यांच्या इशाऱ्यावरून हवालदार विजय काळे यांनी कल्याण पश्चिमेतील डी. बी. चौकातील डाॅन बाॅस्को शाळेसमोरील सार्वजनिक रस्त्यावर तक्रारदाराकडून स्वीकारली.
त्याचवेळी तेथे सापळा लावून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने हवालदार काळे यांना सव्वा लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर पथकाने खडकपाडा पोलीस ठाण्यातून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार साहाय्यक निरीक्षक जोशी यांना ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक प्रमोद अहिरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याने या दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण, डोंबिवलीत महापालिका, पोलीस आणि वाहतूक पोलिसांविरुध्दच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाया नियमित सुरू असतात. दरवर्षी दोन ते तीन कर्मचारी पथकाच्या जाळ्यात अडकतात. कल्याण डोंबिवली पालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेले दोन ते तीन जण प्रशासनाने नुकतेच गुपचूप कामावर हजर करून घेतले आहेत.