कल्याण – कल्याणमधील कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील तीन व्यापाऱ्यांनी वीज मीटर न घेता आपल्या गाळ्यामध्ये महावितरणची चोरून वीज घेतली. या माध्यमातून या तिन्ही व्यापाऱ्यांनी महावितरणची पाच हजार २४६ वीज युनिटची एकूण एक लाख १५ हजार ३३२ रूपयांची वीज चोरी केली आहे. सन २०२२ ते २०२३ या काळातील ही वीज चोरी आहे. या वीज चोरीची तडजोडीची रक्कम या तिन्ही व्यापाऱ्यांकडून सतत तगादा लावूनही भरणा न केल्याने या तिन्ही व्यापाऱ्यांविरुध्द महावितरणचे साहाय्यक अभियंता अशोक जगदाळे यांच्या तक्रारीवरून महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सियाराम वर्मा, शफिक अमीर बागवान आणि श्रवण श्रीचंद्र गुप्ता अशी गुन्हा दाखल व्यापाऱ्यांची नावे आहेत. महावितरणचे दक्षता गुणनियंत्रण विभागाचे साहाय्यक अभियंता अशोक जगदाळे यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की वीज चोरी रोखण्यासाठी शहराच्या विविध भागात शोध मोहीम राबविण्यात येते. कल्याणमध्ये वीज चोरी वाढत असल्याच्या तक्रारी होत्या. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात व्यापाऱ्यांच्या गाळ्यांमधील वीज मीटर शोध मोहीम सुरू होती. या तपासणी मोहिमेत बाजार समिती आवारातील डी -१४ या गाळ्याला वीज मीटर नव्हता. पण तेथील वीज पुरवठा बाहेरून वीज वाहिकेतून घेऊन सुरू होता असे साहाय्यक अभियंता जगदाळे, मधुकर चन्ने आणि साक्षीदार प्रकाश सोनकर, योगेश वाघमारे यांच्या निदर्शनास आले.

मे २०२२ ते एप्रिल २०२३ या कालावधीत श्रवण यांनी ही वीज चोरी केली होती. या कालावधीत श्रवण यांनी वीज मीटर न घेता दोन हजार ६० युनिटची ५६ हजार रूपयांची वीज चोरी केली होती. तडजोडीने ही रक्कम भरणा करण्याचे श्रवण यांना तीन वर्षात कळवूनही त्यांनी ती रक्कम महावितरणकडे भरणा केली नाही म्हणून त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

शफिक बागवान यांनी बाजार समितीमधील डी-१७ गाळ्यात चोरून वीज पुरवठा घेऊन वीज मीटरचा वापर न करता एक हजार ६५० युनिटची आणि १४ हजार ७०३ रूपयांची वीज चोरी केली. महावितरणने बागवान यांना तडजोडीने पाच हजार रूपये भरणा करण्याचे कळविले होते. तीन वर्षात त्यांनी रक्कम भरणा केली म्हणून त्यांच्या विरुध्द महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सियाराम वर्मा यांचा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात व्यापारी गाळा आहे. या गाळ्याला महावितरणचा वीज मीटर न घेता सियाराम यांनी चोरून वीज पुरवठा घेऊन गाळ्यात वीज पुरवठा सुरू ठेवला होता. मागील दोन वर्षाच्या कालावधीत हा चोरीचा प्रकार घडला आहे. वर्मा यांनी ४४ हजार ५९६ रूपयांची वीज चोरी केली आहे. त्यांनी चोरीच्या एक हजार ५३६ युनिटचा वीज वापर केला असल्याचे तपासणी पथकाच्या निदर्शनास आले. सियाराम यांना तडजोडीने दहा हजार रूपये भरण्याची सूचना महावितरणने केली होती. त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले म्हणून महावितरणने त्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.