डोंबिवली – राज्याच्या विविध भागात आलेल्या पूरपरिस्थितीने पीकांच्या हानी बरोबर नागरी जीवन उध्दवस्त केले. अशा पुराच्या फटका बसलेल्या भागाला आर्थिक, वस्तु रूपाने डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे मदत करण्यात येणार आहे. तरीही शहर परिसरातील नागरिकांनी आर्थिक, वस्तु रुपाने या आपत्कलीन निवारण निधीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन श्री गणेश मंदिर संस्थानने केले आहे.
हा आपत्कालीन निवारण निधी राज्याच्या विविध भागातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना योग्य नियोजन करून वाटप केला जाणार आहे. त्यामुळे या निधी संकलन, वस्तू भेट उपक्रमात नागरिकांनी अधिक संख्येने सहभाग व्हावे, असे आवाहन मंदिर संस्थानने केले आहे. नागरिकांनी आपले मदतीचे धनादेश श्री गणेश मंदिर संस्थान नावाने काढायचे आहेत.
नागरिकांच्या सोयीसाठी गणेश मंदिर संस्थान, प्र. के. अत्रे वाचानलय, गणेश वैद्यकीय सुविधा केंद्र, श्री मारूती मंदिर येथे नागरिकांच्या मार्गदर्शन आणि संकलनासाठी कक्ष उभारण्यात आले आहेत. धनादेशाची पावती नागरिकांना देण्यात येणार आहे. गणेश मंदिरात सकाळी आठ ते दुपारी दीड आणि दुपारी तीन ते रात्री आठ वेळेत निधी संकलन केले जाणार आहे.
ब्राह्मण महासंघ साहाय्य
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, कल्याण, ठाणे जिल्हा यांच्यातर्फे पूरग्रस्त भागासाठी दोन ट्रक घरगुती वस्तू जमा करण्यात आल्या आहेत. यामध्ये खाऊचे बंदिस्त कीट आहे. पूरग्रस्त भागातील परिस्थितीचा अंदाज घेऊन त्या भागातील बाधितांना या वस्तू वाटप केल्या जाणार आहेत, असे ब्राह्मण महासंघाचे शशांक खेर यांनी सांगितले.
डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते प्रा. अय्यर यांच्या मार्गदर्शनाखाली एका गटाने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पाळसेवाडी गावातील ग्रामस्थांना आवश्यक वस्तुंचे वाटप केले.
कल्याणमधून मदत
कल्याणमधील पारनाका भागातील श्री महालक्ष्मी देवस्थानतर्फे सोलापूर भागातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वस्तुरूपाने काही मदत जमा करण्यात आली होती. ही मदत महाराष्ट्र राज्य मजदूर संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ यांना सोलापूर भागातील पूरग्रस्त भागात पोहचविण्यासाठी सुपूर्द करण्यात आली. या मदत संकलन उपक्रमात अनघा दिलीप काणे, कॅप्टन ओक शाळेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका मेधा कुलकर्णी, अनंत कुलकर्णी, परेश भिडे, दिलीप काणे सहभागी झाले होते.