कल्याण – एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप झालेला कल्याण मधील अल्ताफ खान (२८) हा तरूण सहा वर्ष आधारवाडी तुरूंगात होता. कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयातील विशेष पाॅक्सो न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. एन. पत्रावळे यांनी सबळ पुराव्यां अभावी, तपास यंत्रणांच्या त्रृटीवर बोट ठेवत आरोपी अल्ताफ खान याची निर्दोष मुक्तता केली. या निकालाच्यावेळी अल्ताफची आई न्यायालयात हजर होती. सहा वर्ष तुरूंगात असलेला मुलगा निर्दोष सुटल्याच्या सुखद धक्क्याने आईला न्यायालयातच चक्कर आली.
या महिलेवर तातडीने प्राथमिक आणि नंतर रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेण्यात आले. याप्रकरणात अल्ताफचे वकील म्हणून ॲड. गणेश घोलप यांनी काम पाहिले. अल्ताफ हा उदवहन दुरूस्त करणारा तंत्रज्ञ आहे. त्याच्या वडिलांचे आणि शेजारील महिलेचे घर भाड्यावरून वाद होते. या वादातून अल्ताफवर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार शेजारील महिलेने पोलीस ठाण्यात केली होती. या प्रकरणात अल्ताफ सहा वर्ष तुरूंगात होता, अशी माहिती ॲड. गणेश घोलप यांनी दिली.
कल्याण परिसरात सन २०२० मध्ये हा प्रकार घडला होता. अल्ताफने आपल्या अल्पवयीन मुलीला घरात बोलविले आणि तिच्यावर अतिप्रसंग केला, असा शेजारील कुटुंबीयांचा आरोप होता. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी अल्ताफला अटक केली होती. अल्ताफने असेही काही केले नाही. या दिवशी आम्ही सगळे घरात होतो. त्यामुळे अल्ताफवरील आरोप निराधार आहेत. तो निर्दोष, असे अल्ताफच्या कुटुंबियांचे म्हणणे होते.
अल्ताफला खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचा कुटुंबीयांचा दावा होता. अल्ताफला जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात ॲड. घोलप यांनी दोन वेळा अर्ज केले होते. ते अर्ज फेटाळण्यात आला होते. त्यामुळे सहा वर्ष त्याला तुरूंगात राहावे लागले. त्याच्या उमेदीच्या काळातील सहा वर्ष फुकट गेली. त्याला यातना भोगाव्या लागल्या, असे कुटुंबीयांनी सांगितले.
याप्रकरणाचा पोलिसांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाच्या सुनावण्यांच्या वेळी न्यायालयाने तपासातील अनेक त्रृटी उघड केल्या. गुन्ह्याप्रमाणे सबळ पुरावे पोलीस उपलब्ध करून देऊ शकले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन अल्ताफ खानची निर्दोष मुक्तता केली.
आरोपी अल्ताफचे वकील ॲड. गणेश घोलप यांनी सांगितले, अल्ताफ खान यांच्या वडिलांचे शेजारील महिले बरोबर घर भाड्यावरून वाद सुरू होता. या वादातून महिलेने अल्ताफवर आरोपी करून त्याच्या विरूध्द पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराची तक्रार केली होती. सुनावणीच्या वेळी पीडित मुलीला आरोपीसमोर आणले गेले. तेव्हा ती अल्ताफला ओळखू शकली नाही. गुन्हा घडला त्या दिवशी अल्ताफ घर परिसरात नव्हता. तक्रार मुलीच्या आईने दिली आहे असे वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले होते. न्यायालयाने सर्व बाजू तपासून अल्ताफ खानची निर्दोष मुक्तता केली.