कल्याण : कल्याण, टिटवाळा शहरांचा पाणी पुरवठा येत्या मंगळवारी (ता. ११) बारा तास बंद ठेवण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने घेतला आहे. या कालावधीत पाणी पुरवठा यंत्रणेतील देखभाल दुरुस्तीची कामे सकाळी नऊ ते रात्री नऊ वेळेत केली जाणार आहेत.

कल्याण, टिटवाळा शहर परिसराला उल्हास नदी काठच्या मोहिली येथील गाव हद्दीतील मोहिली जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा केला जातो. या जलशुध्दीकरण केंद्राच्या यांत्रिक आणि तांत्रिक देखभाल दुरुस्तीचे काम येत्या मंगळवारी केली जाणार आहेत. मोहिली जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या कल्याण शहरातील पूर्वेतील वालधुनी परिसर, कल्याण पश्चिमेतील बिर्ला महाविद्यालय परिसर, उपप्रादेशिक परिवहन विभाग परिसर, टिटवाळा अ प्रभाग क्षेत्रातील मांडा, टिटवाळा, मोहने, आंबिवली, धाकटे शहाड, शहाड, बंदरपाडा, वडवली परिसराचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद राहणार आहे.

बारा तासाच्या पाणी पुरवठा बंदमुळे दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे.नागरिकांनी एक दिवस इतका पाणी पुरवठा आपल्या घरात करून ठेवावा, असे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.