कल्याण : आगामी महापालिका निवडणुकीचा विचार करून कल्याण डोंबिवली पालिकेची एकत्रित चार सदस्यीय प्रभाग रचनेप्रमाणे नवीन प्रभाग रचना शुक्रवारी रात्री शासन निर्देशाप्रमाणे आयुक्त अभिनव गोयल यांनी जाहीर केली. या रचनेत कल्याण डोंबिवली पालिकेत ३१ नवीन प्रभाग असणार आहेत. या नवीन प्रभाग रचनेसंदर्भात नागरिक, राजकीय पदाधिकारी यांना काही आक्षेप असल्यास त्यांना आपल्या हरकती नोंदविण्यासाठी ४ सप्टेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
कल्याण डोंबिवली पालिकेचे यापूर्वी एकूण १२२ प्रभाग होते. या प्रभागांची चार सदस्य एकत्रित पध्दतीने नवीन प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. ही प्रभाग रचना आपल्या सोयीची आहे की नाही याविषयावरून पालिकेवर मागील २५ वर्षांपासून हुकमत ठेवणाऱ्या शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ सुरू होती. शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या कुरबुऱ्यांचे हेही कारण असल्याची चर्चा मंत्रालयात होती. ही नवीन प्रभाग रचना आपल्या सोयीप्रमाणे करावी. नंतर ती प्रसिध्द करावी यासाठी भाजप, शिंदे शिवसेनेकडून मंत्रालयातील वरिष्ठांवर दबाव टाकले जात होते.
अखेर शुक्रवारी भाजप, शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मुख्य नेत्यांची मुंबईत एकत्रित बैठक झाली. ही नवीन प्रभाग रचना आपल्या दोन्ही पक्षांच्या सोयीची आहे यावर एकमत झाल्यावर शिंदे शिवसेना आणि भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने या नवीन प्रभाग रचनेसंदर्भात सकारात्मक भूमिक घेतली. आणि या नेत्यांच्या बैठकीनंतर शुक्रवारी रात्रीच ठाणे, कल्याण डोंबिवली पालिकांची प्रभाग रचना जाहीर झाली, अशी माहिती विश्वसनीय सुत्राने दिली.
प्रभाग रचना
कल्याण डोंबिवली पालिकेची प्रभाग रचना सन २०११ च्या लोकसंख्येप्रमाणे करण्यात आली आहे. सन २०११ च्या जनगणनेप्रमाणे कल्याण डोंबिवली पालिकेची लोकसंख्या १५ लाख १८ हजार ७६२ आहे. यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या एक लाख ५० हजार १७१, अनुसूचित जमातीची लोकसंख्या ४२ हजार ५४८ निश्चित करण्यात आली आहे. नवीन ३१ प्रभाग रचनेतील प्रभाग क्रमांक २१ आणि २५ हे दोन प्रभाग तीन सदस्यीय रचनेचे करण्यात आले आहेत. चार सदस्यीय प्रभागांची संख्या २९ निश्चित करण्यात आली आहे.
तीन सदस्यीय प्रभाग असलेल्या २१ प्रभागाची एकूण लोकसंख्या ३५ हजार ४०७ आहे. यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या १४८८, अनुसूचित जमातीची २९४ आहे. प्रभाग क्रमांक २५ ची लोकसंख्या ३६ हजार ४५२ आहे. यात अनुसूचित जातीची लोकसंख्या १०६२, अनुसूचित जमातीची २०२ आहे. ३१ प्रभाग हे एकूण ४० हजार ते ५० हजार लोकसंख्येचे आहेत. नवीन प्रभाग रचनेत एक पक्ष, गटाचे सदस्य उमेदवार म्हणून निवडून येऊ शकतात. यासाठी प्रत्येक पक्षाने हे गटवारीचे गणित साध्य करण्यासाठी आतापासून प्रभागाप्रमाणे उमेदवार शोधण्याची, दुसऱ्या पक्षातील तगडे पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या पक्षात घेण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.