कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेने १५ ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनी शहरातील लहान मोठ्या प्राण्यांचे कत्तलखाने बंद ठेवणे. तसेच या दिवशी शहरातील मटण, मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. याविषयावरून समाजाच्या अनेक घटक, राजकीय नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेने हा निर्णय मागे न घेतल्यास कल्याणमधील रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पालिका प्रशासनाला दिला आहे.
रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे पदाधिकारी संजय जाधव यांनी यासंदर्भात एक निवेदन आयुक्तांना सोमवारी दिले. या पत्रात पालिकेने १५ ऑगस्ट रोजी शहरातील मटण, मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. या निर्णयाने मटण, मांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या एक दिवसाच्या कमाईवर प्रशासनाने गदा आणली आहे. पालिकेने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा. अन्यथा, रिपब्लिक पक्ष आठवले गट पालिका मुख्यालयासमोर मटण मांस विक्री करणारे विक्रेते, कत्तलखाने चालक यांच्यासह आंदोलन करील, असा इशारा रिपब्लिक आठवले गट पदाधिकारी संजय जाधव यांनी दिला आहे.
याच विषयावरून युवा नेते आदित्य ठाकरे यांनी पालिका प्रशासनावर टीका करत हा निर्णय घेणाऱ्या आयुक्तांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी फक्त वाद पेटविण्यासाठी असे विषय सत्ताधाऱ्यांकडून उकरून काढले जातात. बंदीच्या दिवशी आपण कल्याणमध्ये जाऊन मटण खाऊ. त्यावेळी कोण अडवायला येते ते पाहू, असा इशारा पालिकेला दिला आहे. खासदार सुरेश म्हात्रे यांनी हा निर्णय अनाकलनीय असल्याचे म्हटले आहे. शिंदे शिवसेना आणि भाजप नेत्यांनी या विषयावर मौन बाळगले आहे.
शासन आदेश
नगरविकास विभाग-१० च्या २२ एप्रिल १९८७ च्या आदेशाप्रमाणे वैद्यकीय आरोग्यधिकाऱ्यांच्या निवेदनाप्रमाणे कल्याण डोंंबिवली पालिकेचे तत्कालीन प्रशासक शिवलिंंग भोसले यांनी डिसेंबर १९८८ मध्ये गांंधी जयंती, महावीर जयंती, सवंत्सरी, १५ ऑगस्ट, गणेश चतुर्थी, साधु वासवानी जन्म दिवस (२५ नोव्हेंबर) यादिवशी कल्याण, डोंबिवलीतील कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
शासनाचे शेकडो आदेश पालिकेत येतात, आले. त्या आदेशांची कधी प्रभावी अंमलबजावणी करावी, असे पालिकेला वाटले नाही. त्या आदेशांचा प्रभावी अंमलबजावणी झाली असती तर कल्याण, डोंबिवली शहरे स्वच्छ, सुंदर असती. हे महत्वाचे विषय बाजुला टाकून कत्तलखाने, मटण विक्री दुकाने बंदचा एक जुना पुराणा शासन आदेश काढून पालिकेने हा निर्णय कोणाच्या सुपिक डोक्यातून घेतला. अशा निर्णयांपेक्षा खड्डे, वाहन कोंडीसारखे विषय सोडवा. – सचिन बासरे, माजी शहरप्रमुख, ठाकरे गट. कल्याण.
कोणी काय खावे हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. अनेक मटण, मासळी विक्रेत्यांची कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून आहेत. जाणुनबुजून हा विषय रेटण्यात आला आहे का, हे पाहावे लागेल. – दीपेश म्हात्रे, ठाकरे गट जिल्हाप्रमुख, डोंबिवली.