कल्याण – कल्याण पूर्वेतील जुने कोळसेवाडी पोलीस ठाणे भागात सौभाग्य नाॅव्हेल्टी कपड्याचे दुकान आहे. या दुकानातील कामगार असलेल्या अल्पवयीन तरुणीशी जवळीक साधण्याच्या उद्देशाने अश्लिल लघुसंदेश पाठवून तिचा विनयभंग करणाऱ्या दुकानदाराला पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या निर्देशानुसार तरूणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तात्काळ अटक केली आहे, अशी माहिती कल्याणचे साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिली.

भवन अवचल पटेल (५४) असे दुकानदाराचे नाव आहे. ते नवी मुंबईतील ऐरोली येथील रहिवासी आहेत. दुकानात काम करणारी मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी तरूणीच्या तक्रारीवरून बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याने या दुकानदारावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच, अल्पवयीन तरूणीला दुकानात कामाला ठेऊन बाल कामगार कायद्याचा भंग केल्याने कामगार विभागाने याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

कल्याण पूर्व रेल्वे स्थानक भागातील कोळसेवाडी भागात जुने कोळसेवाडी पोलीस ठाणे परिसरात भवन पटेल यांचे सौभाग्य नाॅव्हेल्टी नावाचे कपड्याचे दुकान आहे. या दुकानात कल्याण पूर्व भागात याच भागातील एक सामान्य कुटुंबातील तरूणी कामगार म्हणून ग्राहक सेवेसाठी दुकानात कामाला होती. या तरूणीशी दुकानदार जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होते. यासाठी त्यांनी तरूणीला मेसेज पाठविण्यास सुरूवात केली. त्यानंतर तरूणीला ते तरूणीला अश्लिल मेसेज पाठवू लागले. तरूणीने सुरूवातीला दुकानदाराला अश्लिल मेसेज पाठवितो म्हणून समजुतदारपणे त्या दुकान मालकाला असे काही मेसेज न पाठविण्याचे सांगितले. तेवढ्या पुरता हो बोललेला दुकानदार तीच कृती पुन्हा करत होता.

या सततच्या प्रकाराने कामगार तरूणी संतप्त झाली होती. दुकानात भवन पटेल यांच्याकडून होत असलेल्या अश्लिल मेसेज प्रकरणाची माहिती तरूणीने आपल्या कुटुंबीयांना दिली. हा प्रकार ऐकून कुटुंबीय संतप्त झाले. त्यांनी दुकान मालकाला धडा शिकविण्याचा निर्णय घेतला. परिसरातील स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांना ही माहिती देण्यात आली. गुरूवारी दुपारच्या वेळेत तरूणी आपल्या कुटुंबीयांसह सौभाग्य नाॅव्हेल्टी दुकानात पोहचली.

तेव्हा तरूणीने आपणास तुम्ही मला अश्लिल मेसेज का पाठविता. तुम्हाला सांगुनही तुम्ही का ऐकत नाही, असे बोलत जवळील चपलेने दुकानदार भवन पटेल यांना चपलेने मारहाण केली. दुकानदार मंचाच्या मागे दडून बसला होता. तरूणीला अश्लिल मेसेज पाठविल्याबद्दल आपण तरूणीची पाय धरून माफी मागा, नाहीतर त्याचे गंभीर परिणाम होतील, अशी तंबी कुटुंबीयांनी दुकानदाराला दिली.

दुकानदाराने सर्वांसमक्ष जाहीरपणे तरूणीची पाया पडून माफी मागितली. या सर्व मारहाण, माफी प्रकरणाची दृश्य ध्वनीचित्रफित तयार करण्यात येऊन ती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आली. याप्रकरणाची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी दुकानदाराला ताब्यात घेतले. त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक धोंगडे करत आहेत.