कल्याण – मागील अनेक वर्ष महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) नियंत्रणाखाली असलेला कल्याण शिळफाटा रस्ता लवकरच ‘एमएसआरडीसी’कडून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) हस्तांतरित करण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठीच्या आवश्यक शासन मंजुऱ्या मिळाल्यानंतर कल्याण शिळफाटा रस्त्यावर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे नियंत्रण राहणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने नाव न प्रसिध्द करण्याच्या अटीवर ही माहिती ‘लोकसत्ता’ला दिली.

गेल्या पंचविस वर्षाच्या कालावधीत शिळफाटा रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य रस्ते विकास महामंडळ यांचेच नियंत्रण राहिले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काळात जिल्हास्तरीय असलेला हा रस्ता सामान्य वर्दळीचा होता. या रस्त्यावरील वाहनांची वर्दळ वाढल्यानंतर या रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण अशा कामांसाठी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काढून पंधरा वर्षापूर्वी शासनाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे दिला. राज्य रस्ते विकास महामंडळाने या रस्त्याचे भिवंडी बाह्यवळण रस्ता, कोन, कल्याणमधील शिवाजी चौक, पत्रीपूल ते शिळ कल्याण फाटा या २१ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण केले.

उरण येथील जवाहरलाल नेहरू बंदर (जेएनपीटी), कोकण, पुणे बाजुकडील औद्योगिक वसाहतींमध्ये जाण्यासाठी कल्याण शिळफाटा नाशिक, गुजरातकडील माल वाहतूक चालकांना मधला मार्ग वाटू लागला. इतर वाहनांबरोबर या रस्त्यावरची माल वाहतूक वाढली. शिळफाटा रस्त्यावरील वाढते खड्डे, वाहतूक कोंडीचा विचार करून गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत या रस्त्याचे रूंदीकरण आणि सीमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले.

‘एमएमआरडीए’ची कामे

शिळफाटा रस्त्यावर आता मेट्रो मार्गाची कामे ‘एमएमआरडीए’कडून सुरू आहेत. या रस्त्यावर शिळ कल्याण फाटा, काटई चौक, सोनारपाडा डोंबिवली नागरी सहकारी बँक, रिजन्सी अनंतम सुयोग हाॅटेल याठिकाणी उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित उड्डाण पुलांची कामे ‘एमएमआरडीए’कडून करण्यात येणार आहेत. नाहूर ते शिळ-काटई नाका उन्नत मार्गाची बांधणी ‘एमएमआरडीए’ करत आहे. शिळफाटा रस्त्यावरीलतळोजा ते कल्याण मेट्रो मार्गाची बांधणी ‘एमएमआरडीए’कडून सुरू आहे.

प्रस्तावित काटई नाका ते बदलापूर मार्ग ‘एमएमआरडीए’कडून उभारला जाणार आहे. शिळफाटा रस्त्यावर”एमएसआरडीस”चे नियंत्रण असले तरी या रस्त्यावरील सुरू असलेली आणि भविष्यात होणारी सर्व विकास कामे ही ‘एमएमआरडीए’कडून होणार असल्याने केवळ शिळफाटा रस्त्याची मालकी आपल्याकडे ठेऊन कागदोपत्री या रस्त्याचे पालकत्व घेण्यापेक्षा हा रस्ता ‘एमएमआरडीए’कडे हस्तांतरित करण्याच्या हालचाली ‘एमएसआरडीसी’कडून सुरू आहेत. या रस्त्यावर विकास कामे करताना प्रत्येक वेळी ‘एमएमआरडीए’ला परवानगीसाठी एमएसआरडीसीकडे येण्याची गरज लागू नये हाही या हस्तांतरणा मागील मुख्य उद्देश आहे. ‘एमएसआरडीसी’च्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने लवकरच या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे, असे सांगितले. या रस्त्याने बाधित शेतकऱ्यांना यापुढे एमएमआरडीकडूनच भरपाई दिली जाईल, असेही हा अधिकारी म्हणाला.

शिळफाटा रस्त्यावरील एमएमआरडीएची वाढती कामे विचारात घेऊन शिळफाटा रस्ता एमएसआरडीसी एमएमआरडीएकडे हस्तांतरित करणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना एमएमआरडीएकडूनच भरपाईसाठी पाठपुरावा करावा लागणार आहे. – गजानन पाटील, अध्यक्ष, सर्व पक्षीय युवा मोर्चा.