कल्याण डोंबिवली पालिकेतील बेशिस्त कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आयुक्तांचा दणका, दीडशे जणांना बजावल्या शिस्तभंगाच्या नोटीसा |kdmc additional commissioner mangesh chitale unruly employees for Disciplinary notices kalyan | Loksatta

कल्याण डोंबिवली पालिकेतील बेशिस्त कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आयुक्तांचा दणका, दीडशे जणांना बजावल्या शिस्तभंगाच्या नोटीसा

पालिकेत सध्या आलबेल असल्याने आपल्यावर कारवाई होणार नाही असा गैरसमज पालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांचा झाला आहे.

कल्याण डोंबिवली पालिकेतील बेशिस्त कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आयुक्तांचा दणका, दीडशे जणांना बजावल्या शिस्तभंगाच्या नोटीसा
कल्याण डोंबिवली पालिकेतील बेशिस्त कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आयुक्तांचा दणका, दीडशे जणांना बजावल्या शिस्तभंगाच्या नोटीसा

कल्याण : पालिकेतील आपण प्रस्थापित, ज्येष्ठ कर्मचारी आहोत. आपणास कोणी काही करू शकत नाही. अशा अविर्भावात असलेल्या कल्याण डोंबिवली पालिकेतील कार्यालयात नियमित उशिरा येणाऱ्या कर्मचाऱी, अधिकाऱ्यांना अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी सोमवारी सकाळी चांगलाच दणका दिला.पालिकेत पदभार स्वीकारल्या पासून गेल्या दोन महिन्यापासून अतिरिक्त आयुक्त चितळे यांना पालिकेतील कर्मचारी, अधिकारी कार्यालयीन वेळेपेक्षा उशिरा येत असल्याचे, कार्यालयात आल्यानंतर चहानाष्टासाठी बाहेर जात असल्याचे, दुपारच्या वेळेत भोजनाची वेळ संपुनही गप्पा गमत्तीत रमत असल्याचे, काही भोजनाच्या वेळेत बाजारपेठेत खरेदीसाठी जात असल्याचे आणि काही कार्यालयीन वेळ (सव्वा सहा) संपण्यापूर्वीच संध्याकाळी साडे पाच वाजता लोकलची वेळ पाहून निघून जात असल्याचे लक्षात आले होते. अनेक नागरिक सकाळी १० वाजता तक्रारी, निवेदने घेऊन पालिकेत येतात. त्यांना कार्यालयात संबंधित कर्मचारी, अधिकारी नाहीत म्हणून प्रतीक्षा करावी लागत असल्याचे अतिरिक्त आयुक्त चितळे यांच्या निदर्शनास आले होते.

पालिकेत सध्या आलबेल असल्याने आपल्यावर कारवाई होणार नाही असा गैरसमज पालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांचा झाला आहे. ऐषआरामी कर्मचाऱ्यांना दणका देण्यासाठी अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे स्वत सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता कल्याण मधील पालिका कार्यालय इमारतीच्या मुख्य प्रवेशव्दारावर सह कर्मचारी घेऊन उभे राहिले. पावणे दहा नंतर आलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी प्रवेशव्दारावर रोखून शिस्तभंगाच्या नोटिसा बजावल्या. या कारवाईत प्रथम श्रेणी अधिकारी, शिपाई, कारकून, अधीक्षक यांचाही सहभाग आढळला. अचानक झालेल्या या कठोर कारवाईने कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले. पालिका मुख्यालयातील बहुतांशी कर्मचारी कार्यालयात सकाळी साडे दहा वाजल्या नंतर येतात. प्रभाग कार्यालयांमधील कर्मचारी अकरा वाजता आरामात कार्यालयात येतात. प्रभाग कार्यालयांमध्ये अतिरिक्त आयुक्तांनी कारवाई सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली.

हेही वाचा : शिळफाटा रस्त्यावरील दिशादर्शकांवर शिंदे समर्थकांच्या वाढदिवसाच्या फलकांमुळे वाहनचालकांचा उडतोय गोंधळ

पाहणी पथक

पालिकेतील प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याने कार्यालयीन वेळेत हजर झालेच पाहिजे. लोकल उशिरा अन्य काही प्रवासी कारण असेल तर त्याचा विचार केला जाईल. बहुतांशी कर्मचारी कार्यालयीन वेळेच्या उशिरा येत असल्याने त्यांच्यावर सोमवारी उशिरा नोंदीची आणि शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. या कर्मचाऱ्यांनी वेळेपेक्षा उशिरा का आलो म्हणून लेखी उत्तर द्यायचे आहे. कारवाईतील कर्मचारी सतत उशिरा येत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र कर्मचारी शिस्त व वर्तणूक अधिनियमान्वये कारवाई केली जाणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त चितळे यांनी सांगितले.

हेही वाचा : डोंबिवलीत महिलेला तरुणाची बेदम मारहाण

मुख्यालय, प्रभागातील कर्मचारी कार्यालयात वेळेत येतात का. त्यांची विहित कामे वेळेत पूर्ण करतात का. नागरिकांच्या तक्रारींची सोडवणूक तात्काळ केली जाते का. कर्मचाऱ्यांची कार्यालयीन वेळेतील कार्यक्षमता तपासण्यासाठी एक पाहणी पथक नेमण्यात येणार आहे. हे पाहणी पथक दर आठवड्याला आपला अहवाल आपल्याकडे देईल. त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता तपासून संबंधितावर कारवाई केली जाईल, असे चितळे यांनी सांगितले.

अनेक कर्मचारी कार्यालयीन वेळेत येत नसल्याचे निदर्शनास आल्याने अचानक प्रवेशव्दारावर उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची हजेरी घेऊन त्यांना शिस्तभंगाच्या नोटिसा दिल्या. यापुढे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेची पाहणी करण्यासाठी एक पाहणी पथक स्थापन केले जाणार आहे. या पथकाच्या अहवालाप्रमाणे कर्मचाऱ्यावर कारवाईचा निर्णय घेतला जाईल. – मंगेश चितळे,अतिरिक्त आयुक्त

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-10-2022 at 15:14 IST
Next Story
बदलापुरच्या वेशीवर पुन्हा बिबट्या ; ग्रामस्थांना सावध राहण्याच्या सूचना