ठाणे : कोपरी परिसरात कोट्यावधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाची केवळ अडीच वर्षांत दुरावस्था झाली आहे. या प्रकल्पात निकृष्ट दर्जाचे काम आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी चौकशीची मागणी केली आहे.
स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या कोपरी खाडीलगतच्या “कोपरी वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट” प्रकल्पाचा फज्जा उडाला आहे. अवघ्या अडीच वर्षांतच कोट्यवधींचा प्रकल्प मोडकळीस आला असून निकृष्ट दर्जा आणि भ्रष्टाचार स्पष्टपणे समोर आला आहे, असा आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता राहुल पिंगळे यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून चौकशी करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
सर्वच सुविधा दुरावस्थेत
या प्रकल्पात शौचालय, ॲम्पी थिएटर, उद्यान, वाहनतळ, जेट्टी रस्ता नूतनीकरण, ऐतिहासिक तोफांसाठी चौथरा, दशक्रियेसाठी घाट अशा सुविधा करण्यात आल्या होत्या. मात्र आज या सर्वच सुविधा दुरावस्थेत दिसत असून नागरिकांच्या पैशांची उघड उधळपट्टी झाली आहे. ॲम्पी थिएटरला तडे, बाकड्यांची मोडतोड, तोफांचा चौथरा उखडलेला, या दृश्यांनी ठाणेकर संतप्त झाले आहेत, असा आरोपही पिंगळे यांनी केला.
ठेकेदारांना काळ्या यादीत टाका
निकृष्ट कामे, भ्रष्टाचार आणि ढिलाई यामुळे प्रकल्पाची दुर्दशा झाली आहे. काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून, जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी पिंगळे यांनी केली आहे. यापूर्वीही स्मार्ट सिटीतील कामकाजावर गंभीर आरोप झाले होते. केंद्रीय नागरी विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी चौकशीचे आदेश दिले होते, मात्र ठोस कारवाई न झाल्याने भ्रष्टाचाराला खतपाणी मिळाल्याचे आरोप होत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.