ठाणे : लोकसभा निवडणुकीसाठी देशभर आचारसंहिता लागू असली तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गृहशहर असलेल्या ठाण्यातच आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत आहे. कारवाईबाबत प्रशासन मात्र ढिम्म आहे.   

शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी शहरातील मुख्य चौकात फलक लावले आहेत. दुसरीकडे सावरकरनगर परिसरात शिंदे गटाचे माजी लोकप्रतिनिधी विविध शासकीय योजनांचे अर्ज नागरिकांकडून भरून घेत होते. घोडबंदर भागात तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्या आगमनाचे स्वागत करणारे फलक लावले आहेत.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी शहरात लावण्यात आलेले सुमारे ३५०० फलक ठाणे महापालिकेने काढले होते. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण कमी झाले होते. मात्र,

हेही वाचा >>> AIADMK Manifesto: निवडणूक जाहीरनाम्यात राज्यपाल नियुक्तीचा मुद्दा! जाहीरनाम्यात आणखी काय?

आता पुन्हा शहरात आचारसंहितेचे उल्लंघन सुरू असल्याचेच चित्र आहे. शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा २४ मार्चला वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांच्या समर्थकांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तीनहात नाका येथील मुख्य चौकात आणि तीन पेट्रोल पंप परिसरात मोठया आकाराचे फलक लावले आहेत. या जाहिरातींवर म्हस्के यांच्या शिवसेनेतील पदांचा उल्लेख आहे. तसेच शिवसेनेच्या इतर मुख्य पदाधिकाऱ्यांची छायाचित्रेही आहेत. 

वागळे इस्टेट येथील सावरकरनगरात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या शासकीय योजनांचे अर्ज भरून घेतले. हे शिबीर १५ ते २२ मार्च या कालावधीत झाले. या शिबिरात पक्षाचा फलक लावण्यात आला होता. समाजमाध्यमांवरून टीकेची जोड उठवल्यानंतर फलकावरील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या छायाचित्रावर कागद चिकटवण्यात आला.

आचारसंहितेच्या नियमानुसार पदाधिकाऱ्यांच्या छायाचित्रांचा वापर करू शकतो. परंतु, पक्षाच्या चिन्हाचा वापर करू शकत नाही. आचारसंहितेचे उल्लंघन करू नका, अशी सूचना सर्व नेत्या-कार्यकर्त्यांना दिली आहे. तरीही कोणी आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन केले असेल तर, प्रशासन कारवाई करेल.

– मीनाक्षी शिंदे, ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख, शिवसेना (शिंदे गट)

आचारसंहितेचे नियम सर्वांसाठी सारखेच असतात, परंतु काही ठराविक नेते ते मोडण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

राजीव शिरोडकर, विभागप्रमुख, ठाकरे गट, सावरकर नगर.

शहरात लावलेल्या राजकीय नेत्यांच्या फलकांविषयी तक्रारी आल्यानंतर कारवाई करण्यात आली.

 – मनीषा जायभाये, निवडणूक निर्णय अधिकारी, ठाणे लोकसभा मतदारसंघ.