ठाणे : ठाण्यातील नितीन कंपनी चौक परिसरात “महाराष्ट्राचं स्वप्न साकार झालं” या आशयाचे फलक लावण्यात आले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी स्वप्नील महिंद्रकर यांनी हा फलक लावला आहे. महाराष्ट्राच्या नेतृत्व परंपरेचा आणि बदलत्या राजकीय समीकरणांचा प्रतीकात्मक संदर्भ त्यात मांडण्यात आला असून या बॅनरची चर्चा सर्वत्र होत आहे.

राज्यातील सत्तेच्या समीकरणांमध्ये अलीकडे झालेल्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर या फलकातील “दोन पिढ्यांची एकत्रता” ‘राजकीय पुनर्मिलनाचा संकेत’ हा संदेश आहे. या फलकात महाराष्ट्रातील दोन पिढ्यांची राजकीय परंपरा आणि नेतृत्वाचं एकत्र चित्रण दाखविण्यात आलं आहे.

मागे जयघोष करणारा जनसमुदाय, हातात झेंडे घेऊन उत्साहाने उभे कार्यकर्ते आणि आकाशात उजळणारा तेजोमय प्रकाश या दृश्यांमधून “जनतेचा विश्वास आणि महाराष्ट्राचं स्वप्न साकार झालं” हा भावनिक संदेश दिल्याचे ठळकपणे दिसून येतो.

स्वप्नील महिंद्रकर यांनी या संदर्भात सांगितले, “वीस वर्षांनंतर ठाकरे कुटुंब एकत्र आले असून, मराठी माणसाचं स्वप्न आता वास्तवात उतरलं आहे. येत्या काळात मराठीसाठीचा लढा आणखी तीव्र होईल आणि मराठी माणसाला सुखाचे दिवस नक्की येतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, या फलकाचे छायाचित्र सामाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून या फलका मुळे राजकीय संदेश आणि आगामी निवडणुकांची पार्श्वभूमी यावर चर्चा सुरू आहे. नितीन कंपनी चौक परिसर आता राजकीय चर्चेचं केंद्र ठरत आहे. या फलकाने महाराष्ट्रातील आगामी राजकीय समीकरणांना एक नवा कलात्मक आणि प्रतीकात्मक रंग दिल्याची ठाण्यात चर्चा आहे.