ठाणे – गणेशाच्या दर्शनाला जाताना प्रत्येक भाविक फळे, फुले, नारळ, पेढे घेऊन जात असतो. मात्र विद्येचा देवता असणाऱ्या गणेशासमोर विद्या देणारे वही, पेन ठेवा असा अनोखा उपक्रम महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब यांच्यावतीने उथळसर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात राबविण्यात आला आहे.

गणेशोत्सवात सगळीकडे नवनवीन संकल्पना, विविध सजावट आणि भक्तीभावाने सजलेले घरगुती तसेच सार्वजनिक मंडप हे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. त्याचबरोबर गणेशोत्सवात अनेक मंडळे समाजहिताचे उपक्रम राबवतात. काही मंडळांकडून पर्यावरणपूरक सजावट केली जाते, तर काही ठिकाणी आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, महिला बचतगटांना प्रोत्साहन असे कार्यक्रम आयोजित केले जातात. काही मंडळे विविध राष्ट्रीय विषयांवर आधारित देखावे साकारून जनतेला जागरूक करतात.

यातून गणेशोत्सव हा केवळ भक्तीभावापुरता मर्यादित रहाण्याऐवजी सामाजिक बदलाची चळवळ बनत असल्याचे दिसते. अशातच महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब यांच्यावतीने ठाणे शहरातील उथळसर परिसरात असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘ एक वही, एक पेन’ हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमात मंडळातील गणेशाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना फळे, फुले किंवा नारळ आणण्याऐवजी एक वही आणि एक पेन घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले.

उपक्रमात गणेशोत्सवाच्या दहा दिवसांमध्ये जमा झालेले शैक्षणिक साहित्य आदिवासी पाड्यातील गरजू विद्यार्थ्यांना मंडळाच्या वतीने देण्यात येणार आहेत असे मंडळाचे अध्यक्ष योगेश भंडारी यांनी सांगितले. महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब ५३ वर्ष सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन करत आहे. या मंडळाची स्थापना जनार्दन वैती यांनी केली होती. अध्यक्ष योगेश भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवत आहे.

महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष योगेश भंडारी यांच्या पुढाकारातून यंदा वारली संस्कृती आणि कलेचा अनुभव घेता येईल असा अनोखा देखावा तयार केला गेला आहे. या देखाव्यामध्ये आदिवासी झोपडीच्या कुडांवर (कारवीच्या भिंती) नैसर्गिक रंगात वारली चित्रे, झाडे, वन्यजीव आणि घरातील पारंपारिक साहित्य रेखाटण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, झोपडीतील दिवा (प्रकाशासाठीचे साधन) रात्रीच्या प्रकाशात अधिक आकर्षक ठरत आहे.