ठाणे – पर्यटन वृद्धीसाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपायोजना आखण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळे आणि तीर्थस्थळांच्या विकासासाठी आराखडा आखण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ३९ तीर्थस्थळे आणि ३९ पर्यटन स्थळांची यादी निश्चित करण्यात आली आहे. या पर्यटन स्थळांच्या यादीत शहापूर आणि मुरबाड भागातील सर्वाधिक स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे गेली अनेक वर्षे पर्यटन स्थळांचा दर्जा मिळून देखील दुर्लक्षित असलेल्या या स्थळांचा विकास होण्यास मदत होणार आहे.
ठाणे जिल्ह्याला पर्यटनाचा एक समृद्ध वारसा लाभला आहे. जिल्ह्यातील शहरी भागांसह ग्रामीण भागात मोठया संख्येने पर्यटन स्थळे आहेत. किल्ले, खाडी किनारा, समाधीस्थळे, प्राचीन मंदिरे, तलाव, पुरातनकालीन विहिरी यांसह विविध ठिकाणांनी ठाणे जिल्हा समृद्ध आहे. मात्र स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष, या स्थळांच्या विकासाबाबत राजकीय उदासीनता यामुळे जिल्ह्यातील अनेक पुरातन वस्तू आणि धार्मिक स्थळांकडे सातत्याने दुर्लक्ष झाले आहे. तर या उदासीनतेमुळे यातील अनेक स्थळांची दुर्दशा झाली आहे. यांचा विकास झाला नसल्याने सर्व सामान्य नागरिकांना याबाबत माहिती देखील मिळत नाही.
याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातुन सर्वेक्षण करून शहरी आणि ग्रामीण भागातील विविध स्थळांची निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये ठाणे, अंबरनाथ, कल्याण, शहापूर, मुरबाड तसेच भिवंडी येथील स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अनेक महत्वाच्या मात्र दुर्लक्षित ठिकाणे आहेत. या सर्व स्थळांचा अभ्यास करून त्यांचे उत्तम विकास व्हावा यासाठी आरखडा तयार करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पर्यटन हा केवळ करमणुकीचा किंवा धार्मिक यात्रेचा विषय नसून तो एका प्रदेशाच्या सर्वांगीण विकासाचा मूलभूत आधार मानला जातो. एखाद्या भागात पर्यटनाची साधने, तीर्थस्थळे किंवा नैसर्गिक संपदा असली, तरी त्यांचा योग्य प्रकारे विकास झाला नाही, तर त्याचा लाभ स्थानिकांना मिळत नाही. मात्र, जेव्हा अशा ठिकाणांचा विकास आराखड्याअंतर्गत केला जातो, तेव्हा त्याचे थेट व अप्रत्यक्ष परिणाम स्थानिक अर्थव्यवस्था, रोजगारनिर्मिती, सांस्कृतिक वारसा जपणे आणि ग्रामीण भागाचा दर्जा उंचावणे या सर्व क्षेत्रांवर होतात.
ग्रामीण भागातील पर्यटनस्थळांचा विकास झाला, तर तिथे पर्यटकांची गर्दी वाढते. यामुळे स्थानिक स्तरावर हॉटेल व्यवसाय, वाहतूक सेवा, हस्तकला, भाजीपाला, फळबाग, दुग्ध व्यवसाय अशा विविध क्षेत्रांना चालना मिळते. पर्यटक स्थानिक उत्पादने खरेदी करतात, ज्यामुळे शेतकरी आणि कारागीर थेट लाभार्थी ठरतात. अशा पद्धतीने पर्यटन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या चक्राला गती देणारा महत्त्वाचा घटक ठरतो याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून ग्रामीण भागातील अनेक महत्वाच्या स्थळाचा पर्यटन आराखड्यात समावेश करण्यात आला आहे.
पर्यटनस्थळे
ठाण्यातील येऊर, बेलापूर किल्ला कळवा मुंब्रा रेतीबंदर घोडबंदर किल्ला, अंबरनाथचे प्राचीन शिव मंदिर, कोंडेश्वर, मुरबाड मधील सिद्धगड डोंगरन्हावे, माळशेज घाट, सिंगापूर नाणेघाट, धसई डॅम, शहापूर येथील जांभे धरण, भातसा पाटबंधारे स्थळ, चेरवली, खरिड तसेच मुरबाड येथील त्रिवेणी संगम – मानिवली यांसह हा विविध स्थळ पर्यटन स्थळ म्हणून निश्चित करण्यात आले आहे.
तीर्थस्थळ
भिवंडीतील वज्रेश्वरी, अकलोली, गणेशपुरी, तसेच अंबरनाथ तालुक्यातील मुळगाव, मुरबाड येथील म्हसा, गोरखगड, शहापूर येथील माहुली, डोळखांब, बिरवाडी, टाकेश्वर मठ, कल्याण येथील कांबा पाचवा मैल, लोणाड येथील प्राचीन शिवमंदिर यांसह अनेक धार्मिक स्थळांचा या ठिकाणी विकास करण्यात येणार आहे.