कल्याण : माझे विरोधक मोक्का गुन्ह्यातील कुणाल पाटील यांना क्लीन चिट मिळण्यासाठी शिंदे शिवसेनेतील नेत्यांनी प्रयत्न केले. माझ्यासह माझ्या मुलाच्या हत्येचा कट रचणाऱ्या विरोधकांना अटक करू नका म्हणून माझ्या विरोधकांना पक्षातून साहाय्य करण्यात आले. अशाप्रकारे ज्या पक्षात राहतो तेथील नेतेच माझ्या विरोधकांना मदत करत असतील, त्यांना मोठे करत असतील तर तेथे राहून काय उपयोग, असा प्रश्न शिंदे शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी नगरसेवक महेश पाटील यांनी माध्यमांसमोर बोलताना केला. शिंदे शिवसेनेतील नेत्यांंना टीकेचे लक्ष्य केले.

मी बोलणार ते तुम्ही मंडळी छापणार नाहीत आणि छापत नाहीत. त्यामुळे मी जे बोलणार आहे ते प्रक्षोभक आहे. ते तुम्ही दाखविणार, लिहिणार असाल तरच मी बोलतो असे माध्यम प्रतिनिधींना ठणकावून महेश पाटील यांनी आपले मनातील अनेक दिवसांचे साचलेपण रिते केले. आपण शिंदे शिवसेना का सोडली हे स्पष्ट केले.

माझे विरोधक कुणाल पाटील हे मोक्का गुन्ह्यात अटक होते. त्यांना क्लीन चिट मिळवून देण्यात शिंदे शिवसेनेतील नेत्यांनी मदत केली. आपल्यासह माझ्या मुलाच्या हत्येचा कट रचला जात आहे हे माहिती असुनही अशाप्रकारचे कृत्य करणाऱ्यांना अटक करू नका म्हणून खूप दबाव आणण्याचे काम आमच्याच नेत्यांनी केले, अशी माहिती महेश पाटील यांनी दिली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचे आपण एक निष्ठावान कार्यकर्ते होतो. त्या पक्षात राहून उलट आपल्याच विरोधकांना मोठे करण्याचे काम शिवसेनेतील नेते करत होते. हे समजल्यापासून आपण अस्वस्थ होतो, असे पाटील म्हणाले.

अशाप्रकारे एकाच पक्षातील नेते दोन ठिकाणी पाय ठेऊन राजकारण खेळत असतील, माझ्या विरोधकांंना मोठे करत असतील तर ते माझ्यासाठी नक्कीच त्रासदायक होते. माझ्या मुलाच्या हत्येचा कट रचला जात आहे. त्यासाठी विरोधकांना अटक करण्यासाठी साहाय्य करण्याऐवजी याऊलट असा कट रचणाऱ्यांना अटक करू नका म्हणून सतत यंत्रणेवर दबाव आणला जात असेल तर मला पक्षापेक्षा माझ्या मुलाचा जीव महत्वाचा आहे, असे पाटील यांनी सांगितले.

कुणाल पाटील यांना मोक्कातून क्लीन चीट दिली. मग तुम्ही माझ्या मुलाच्या हत्येचा कट रचणाऱ्या वंडार पाटील यांना कधी अटक करणार असे प्रश्न आपण यंत्रणेला केले. तेव्हा त्यांनी आमच्यावर वरून खूप दबाव आहे. आम्ही त्यांना अटक करू शकत नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कोणाचा दबाव विचारल्यावर त्यांनी तुमच्याच पक्षातील लोकांचा दबाव असल्याचे स्पष्ट केले. हे ऐकून आपण खूप अस्वस्थ झालो, असे पाटील यांनी सांगितले.

आपल्या मनाचा कोंडमारा सुरू होता. ही अस्वस्थता फोडण्यासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असे महेश पाटील यांनी सांगितले. पक्षात राहून कोणी कोणाला साहाय्य करावे हा प्रत्येक नेत्याचा प्रश्न आहे. आपल्या विरोधकांना मदतीचा हात पक्षातून दिला जात असेल तर मात्र तेथे काम करणे खूप अशक्य होते, असे पाटील यांनी स्पष्ट केले.