ठाणे – ठाण्यातील ढोकाळी भागातील हायलँड पार्क परिसरात इमारतीचे बांधकाम सुरू असताना एका व्यक्तीचा सातव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी २.३५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेत व्यक्ती लोखंडी परांची आणि दोरखंडमध्ये अडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

सचिन गुंडेकर(४९) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते मुलुंड येथील सर्वोदया नगर मध्ये राहत होते. गुंडेकर हे एका नामांकित कंपनीमध्ये स्टोअर व्यवस्थापक म्हणून काम करत होते. ढोकाळी भागातील हायलँड पार्क परिसरातील इमारत क्रमांक -२ ही तळ अधिक ३२ मजली इमारत आहे. या इमारतीच्या सातव्या मजल्यावर शुक्रवारी दुपारी २.३५ वाजताच्या सुमारास बांधकाम सुरू होते.

इमारतीचे बांधकाम सुरू असताना सातव्या मजल्यावरून सचिन गुंडेकर हे खाली पडले. त्यावेळेस तळमजल्यावर असलेल्या लोखंडी परांची आणि दोरखंडमध्ये ते अडकल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी बाळकुम अग्निशमन केंद्राचे स्थानक अधिकारी, कापूरबावडी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. गुंडेकर यांचा मृतदेह अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढला. हा मृतदेह कापूरबावडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून त्यांनी मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे.