Navi Mumbai Airport, maharashtra navnirman sena : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील भरती प्रक्रियेत स्थानिक मराठी भाषिकांना प्राधान्य दिले जात नसल्याचा गंभीर आरोप मनसेने केला आहे. सिडको आणि विमानतळ प्रशासनाने ८०% स्थानिकांना रोजगार देण्याच्या धोरणाला हरताळ फासल्याचे नवी मुंबईतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.
नवी मुंबई विमानतळात एकूण चार टर्मिनल असून प्रत्येक टर्मिनलवर साधारणपणे २५ हजार नोकऱ्या म्हणजेच एकूण १ लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मात्र, सध्या पहिल्या टर्मिनलवरील भरती प्रक्रियेत स्थानिकांना डावलले जात आहे.माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार सिडकोने स्थानिक आणि मराठी भाषिक उमेदवारांना प्राधान्य देणारे कोणतेही धोरण आखलेले नाही, तसेच किती स्थानिक उमेदवारांना संधी मिळाली याची माहितीही प्रशासनाकडे उपलब्ध नाही, असा आरोप मनसेने पत्रकार परिषदेत केला आहे. “सरकार नवी मुंबई विमानतळातील एक लाख नोकऱ्या परप्रांतीयांच्या घशात घालणार आहे.” अशी टीका मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केली.
त्यांनी पुढे सांगितले की, दोन वर्षांपूर्वी अयोध्येत स्थापन झालेल्या एका कंपनीने नवी मुंबई विमानतळात नोकरी लावण्याचे आश्वासन देऊन अनेक मराठी तरुणांची फसवणूक केली. एका तरुणाकडून ८८ हजार रुपये घेण्यात आले होते.परंतू, त्याला नंतर नोकरी मिळाली नाही. तर, बेलापूर विभागाध्यक्ष भूषण कोळी यांनी सांगितले की, सिडकोने स्थानिक भूमिपुत्रांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला होता. मात्र, तो प्रशासनाच्या अनास्थेमुळे बंद झाला. त्यामुळे आता भूमिपुत्रांना खासगी प्रशिक्षण केंद्रात लाखो रुपये मोजावे लागत आहेत.या पत्रकार परिषदेत मनसे प्रवक्ते आणि शहराध्यक्ष गजानन काळे, उपशहराध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव विलास घोणे, महिला सेना शहराध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, विद्यार्थी सेना अध्यक्ष संदेश डोंगरे, आणि विभागाध्यक्ष भूषण कोळी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
मराठी तरुणांना नोकरी दिली नाही तर धावपट्टी उखडून टाकू
मराठी तरुणांना नवी मुंबई विमानतळावर नोकरी दिली नाही तर, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार विमानतळावरून एकही विमान उडू देणार नाही. तसेच मनसे नेते अमित ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्षांचा भव्य मोर्चा काढला जाईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
