कल्याण : कल्याण शीळफाटा रस्त्यावरील लोढा पलावा येथील एका बिर्याणी दुकानाला मंगळवारी सात वाजण्याच्या दरम्यान अचानक आग लागली. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. आगीत दुकान जळून खाक झाले आहे. डोंबिवली अग्निशमन विभागाच्या जवानांनी एक तासाच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

लोढा पलावा भागात केजीएन नावाने बिर्याणीचे दुकान आहे. संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत या दुकानात बिर्याणी खाण्यासाठी ग्राहकांची वर्दळ असते. या दुकानाच्या बाजुला इतरही विविध प्रकारची दुकाने आहेत. लोढा पलावा परिसरातील नागरिकांची सकाळी कामावर जाण्याची घाई सुरू असतानाच परिसरात धुराचे लोट दिसू लागले. आग लागल्याचा ओरडा ऐकू येऊ लागला. त्यावेळी लोढा पलावा वसाहतीजवळील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरील केजीएन या बिर्याणीच्या दुकानाला भीषण आग लागल्याचे स्पष्ट झाले.

आग लागताच या रस्त्यावरून जाणारी दुतर्फाची वाहने जागीच खोळंबून राहिली. त्यामुळे या भागात काही वेळ वाहतूक कोंडी झाली. ही माहिती तातडीने कल्याण डोंबिवली पालिका अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन विभागाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिर्याणी दुकानाची आग तीव्र पाण्याच्या माऱ्याने विझविण्या बरोबरच ही आग आजुबाजुला पसरणार नाही या दृष्टीने बाजुच्या दुकानांवर पाण्याचे फवारे मारून आग जागीच शमविण्याचा प्रयत्न केला.

सोमवारी रात्री दुकान बंद केल्यानंतर कामगारांनी दुकान सुस्थितीत लावून घरी निघून गेले होते. गाळ्यामध्ये असलेल्या या बिर्याणी दुकानात शीतकपाट, बिर्याणी तयार करण्याचे साहित्य, इतर सामान होते. सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान दुकानात हळुहळू धुमसत असलेली आग अचानक वाढली. दुकानात फर्निचर, लाकडी खुर्च्या, मंच होते. ही सर्व सामग्री आगीत जळून खाक झाली. अग्निशमन जवानांनी पहिल्या अर्ध्या तासात गाळ्यातील आगीवर नियंत्रण मिळविले. त्यानंतर धुमसत असलेली आग विझविण्याचे काम केले. आग एक तासाच्या कालावधीत पूर्ण विझल्यानंतर अग्निशमन दलाने आपले काम थांबविले. आग लागल्यानंतर या भागात बघ्यांची गर्दी जमली होती. या आगीच्या प्रतिमा आपल्या मोबाईलमधील कॅमेऱ्यातून टिपण्यासाठी गर्दी जमली होती.

आग विझेपर्यंत या रस्त्यावर दुतर्फा वाहनांचा रांगा लागल्या होत्या. आग विझण्याची लवकर शक्यता नसल्याने अनेक वाहन चालकांनी पर्यायी मार्गाने जाणे पसंत केले. मागील काही दिवसांपासून सतत कोसळणारा पाऊस मंगळवारी सकाळपासून गायब होता. आग दुकानातील शीतकपाटातील तांत्रिक बिघाडामुळे की विजेच्या शाॅर्ट सर्किटमुळे लागली हे नक्की कळू शकले नाही. या आगीच्या तपासानंतर आग नक्की कशामुळे लागली हे समजेल, असे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.