एमसीएचआय-क्रेडाई कल्याण शाखेतर्फे नामवंत विकासकांच्या मालमत्तांचे प्रदर्शन १९ ते २२ मे रोजी कल्याण पश्चिमेतील लाल चौकी येथील फडके मैदानावर आयोजित केले आहे. ३५ प्रसिध्द विकासकांचे १५० हून अधिक गृह प्रकल्पांचे आराखडे, संकल्पचित्र ग्राहकांना या प्रदर्शनात एका ठिकाणी पाहण्यास मिळणार आहेत, अशी माहिती एमसीएचआय कल्याण शाखेचे अध्यक्ष श्रीकांत शितोळे यांनी शुक्रवारी दिली.
या अकराव्या प्रदर्शनाचे उद्घाटन १९ मे रोजी सकाळी ११ वाजता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पंचायत राज मंत्री कपील पाटील, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, आमदार रवींद्र चव्हाण, आ. प्रमोद पाटील, आ. विश्वनाथ भोईर, आ. गणपत गायकवाड यांच्या उपस्थितीत होणार आहे. सिने कलाकार व महोत्सवाचा राजदूत श्रेयस तळपदे उपस्थित राहणार आहे.
करोना महासाथीच्या दोन वर्षात अनेक रहिवाशांची स्वप्नातील नवे घर घेण्याची इच्छा होती. कठोर टाळेबंदी, करोनाचा धोका त्यामुळे बांधकाम व्यवसाय ठप्प होता. घरातून बाहेर पडणे शक्य नव्हते. आता महामारी संपुष्टात आल्याने लोक नवीन घराच्या शोधासाठी बाहेर पडली आहेत. त्यांना एका छताखाली, एका ठिकाणी स्वप्नातील, कुटुंबीयांच्या मनातील आपल्या आर्थिक चौकटीतील घर खरेदी करता यावे या उद्देशातून या मालमत्ता प्रदर्शनाचे आयोजन केले आहे, असे माजी अध्यक्ष रवी पाटील यांनी सांगितले.
मागील प्रदर्शनाचा अनुभव आणि लोकांची सध्या नवीन गृह प्रकल्पांच्या ठिकाणी घरासाठी होत असलेली विचारणा पाहता, कल्याणमधील मालमत्ता प्रदर्शनाला सुमारे २५ हजाराहून अधिक लोक भेट देतील, असा विश्वास अध्यक्ष शितोळे यांनी व्यक्त केला.
या गृह प्रकल्पांमध्ये कल्याण, डोंबिवली शहरी भागातील नवीन गृह प्रकल्पांमध्ये ४० लाख रूपयांपासून ते दीड कोटी पर्यंतचे घर विक्रीसाठी असणार आहे. परवडणाऱ्या घरांचा विचार करता २७ गाव, टिटवाळा, आंबिवली, मोहने परिसरात रहिवासी आपल्या आर्थिक कुवतीप्रमाणे घरे घेऊ शकतात. गेल्या दोन वर्षात महासाथीमुळे बांधकाम व्यवसाय बंद पडला होता. परंतु, केंद्र, राज्य शासनाने बांधकाम व्यवसायाविषयी महत्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेतले. त्यामुळे या व्यवसायाला आता उभारी आली आहे. ठप्प असलेले गृहप्रकल्प पूर्ण होत आहेत. विकासकांना मुद्रांक शुल्क सवलत मिळाल्याने आपोआप ग्राहकावरील बोजा कमी झाला. शासनाला महसूल मिळाला. ग्राहकांना आपल्या आर्थिक चौकटीतील घर खरेदी करणे शक्य झाले, असे अध्यक्ष श्रीकांत शितोळे यांनी सांगितले.
शासनाचे बांधकामा व्यवसायाविषयीची लवचिकता, धोरणात्मक निर्णय त्यामुळे दोन वर्षापूर्वी ५० टक्क्यांनी घटलेला हा व्यवसाय आता १२० टक्क्यांनी वाढला आहे. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत आता १५० हून अधिक गृह प्रकल्प सुरू आहेत. बांधकाम साहित्याच्या किमती वाढल्या आहेत. शासनाने या किमतीचा विचार करावा. अशी मागणी करण्यात आली आहे. ग्राहकांवर या वाढीचा अधिकतम बोजा पडणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे, असे शितोळे यांनी सांगितले.
यावेळी जयेश तिवारी, सुनील पाटील, दिनेश मेहता, राहुल कदम, सुनील चव्हाण, रोहन दीक्षित, राजन बाळसराफ उपस्थित होते.
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत सुरू असलेले स्मार्ट सिटी, टिटवाळा-काटई वळणरस्ता, मेट्रो मार्ग, उड्डाण पूल या सुविधांमुळे विविध भागातील रहिवासी या शहरांमधील घरांना पसंती देत आहेत. त्यांच्या स्वप्नातील दर्जेदार आकर्षक घर देण्याचा प्रयत्न विकासक करत आहेत. या प्रदर्शनातून त्यांना हे गृह प्रकल्प पाहता येतील. – श्रीकांत शितोळे अध्यक्ष एमसीएचआय- कल्याण
