डोंबिवली : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अंबरनाथ तालुक्यातील जांभुळ जलशुध्दीकरण केंद्र आणि बारवी गुरूत्व वाहिनी देखभाल दुरुस्तीची कामे एमआयडीसीच्या तांत्रिक आणि यांत्रिक विभागाकडून गुरूवार ९ ऑक्टोबर रात्री १२ ते शुक्रवार १० ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजता या चोवीस तासाच्या कालावधीत करण्यात येणार आहेत. त्यामुळे या कालावधीत या जलशुध्दीकरण केंद्रातून आणि गुरूत्व वाहिनीतून पाणी पुरवठा होणाऱ्या उल्हासनगर, डोंबिवली, कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्र, उल्हासनगर पालिका आणि परिसरातील औद्योगिक, निवासी आणि ग्रामीण भागाला होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
एमआयडीसी डोंंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर आव्हाड यांनी ही माहिती दिली आहे. बारवी धरणातून सोडण्यात आलेले पाणी अंंबरनाथ तालुक्यातील जांभुळ गाव हद्दीतील एमआयडीसीच्या जलशुध्दीकरण केंद्रात प्रक्रिया करून मग ते नवी मुंबई, तळोजा, कल्याण डोंबिवली पालिका, डोंबिवली औद्योगिक, निवासी क्षेत्र, उल्हासनगर पालिका, अंबरनाथ, कळवा, ठाणे, मुंब्रा परिसराला पुरवठा केले जाते. दररोज बारवी धरणातून सुमारे अकराशे दशलक्ष लीटर पाणी पुरवठा ठाणे जिल्ह्याच्या निम्म्या शहरांना पुरवठा केले जाते.
पावसाळ्यात डोंगर, दऱ्यांमधून अधिक प्रमाणात माती, पालापाचोळा नदीच्या पाण्यांमधून वाहून येतो. हे कच्चे पाणी नदीतून उचलताना उदंचन केंद्रातील यंत्रणेत अनेक वेळा मातीचे, पालापाचोळ्याचे थर साचतात. यामुळे अनेक वेळा यंत्रणा खराब होण्याची शक्यता असते. वेळच्या वेळी ही यंत्रणा स्वच्छ करण्यासाठी एमआयडीसीला वेळोवेळी या यांत्रिक, तांत्रिक दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद ठेवावा लागतो.
येत्या गुरूवारी जांंभुळ येथील जलशुध्दीकरण केंद्र आणि बारवी गुरूत्व वाहिनी देखभाल दुरुस्तीचे काम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून केले जाणार आहे. या दुरुस्तीच्या कालावधीत जलशुध्दीकरणातून बाहेर पडणाऱ्या वाहिकांमधील पाणी पुरवठा बंद ठेवावा लागतो. या वाहिकांमधून कल्याण डोंबिवली पालिका हद्द, ग्रामीण परिसर, उल्हासनगर महापालिका, तळोजा औद्योगिक क्षेत्र, या भागातील ग्रामपंचायतींना पाणी पुरवठा केला जातो.
गुरुवारी आणि शुक्रवारी रात्रीपासून या विभागांचा पाणी चोवीस तासासाठी बंद असणार आहे, असे कार्यकारी अभियंता आव्हाड यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.बंदच्या पूर्वसूचनेमुळे अनेक उद्योजक दोन दिवस अगोदर पाण्याचे खासगी टँकर आपल्या आवारात आणून ठेवतात. त्यामुळे उत्पादन प्रक्रियेसाठी एमआयडीसीचे पाणी नसले तरी उत्पादन प्रक्रिया खासगी टँकरमधून मिळणाऱ्या पाण्यातून सुरू राहते.