Thane News : शहापूर : गणेश विसर्जनाच्या दिवशी (शनिवारी) भारंगी नदीत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह मंगळवारी दुपारी घटनास्थळापासून सुमारे पाच किमी अंतरावर भातसा नदीत हिव – अंदाड गाव परिसरात आढळून आला. कुलदीप जाखेरे असे मृताचे नाव असून मागील तीन दिवसांपासून त्याचा बचाव पथकाकडून शोध सुरू होता. या घटनेत आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोघांना वाचविण्यात पथकांना यश आले. या घटनेनंतर शहापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे.
आसनगाव जवळील मुंडेवाडी येथील शिवतेज मित्र मंडळाच्यावतीने गणेशोत्सव साजरा होतो. अनंत चतुर्दशी निमित्ताने १० दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. ठाणे जिल्ह्यात उत्सवात ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूका निघाल्या होत्या. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात नदी, बंधाऱ्यामध्ये गणेशमूर्ती विसर्जनाची परंपरा आहे. परंतु या ठिकाणी एक दुर्घटना घडली. मंडळाच्या वतीने गणेश आरती सुरु होती. या दरम्यान भारंगी नदीत दत्तू लोटे या तरुणाने पाण्यात पोहण्यासाठी उडी मारली. गणेश विसर्जनाच्या दिवशी पाऊस सुरु होता. त्यामुळे पाण्याचा अंदाज आला नसल्याने दत्तू बुडू लागला.
वाचविण्यासाठी गेले अन् तिघेही बुडाले
दत्तू याला वाचवण्यासाठी मुंडेवाडीच्या शिवतेज मित्रमंडळातील कुलदीप जोखेरे, प्रतिक मुंढे, रामनाथ घारे आणि भगवान वाघ या चार तरुणांनी एका पाठोपाठ उड्या मारल्या. परंतु ते देखील बुडाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जीव रक्षक पथक आणि एनडीआरएफचे पथके घटनास्थळी दाखल झाले. जीव रक्षक पथकाने शनिवारी मंडळाच्या इतर कार्यकर्त्यांच्या मदतीने रामनाथ, भगवान आणि प्रतिक यांना पाण्यातून बाहेर काढले. तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डाॅक्टरांनी प्रतिक याला मृत घोषित केले. तर रामनाथ आणि भगवान यांचा जीव बचावला होता. दुसऱ्या दिवशी, रविवारी एनडीआरएफ आणि जीव रक्षक पथकाला दत्तू लोटे याचा मृतदेह आढळून आला होता. परंतु कुलदीप याचा शोध लागत नव्हता. त्याचा मृतदेह तब्बल तीन दिवसांनी जीव रक्षक टीमला घटनास्थळापासून सुमारे पाच किमी अंतरावर हिव – अंदाड गावच्या परिसरातील भातसा नदीत आढळून आला. याप्रकरणाची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात दाखल आहे.
शहापूरात शोककळा
या घटेनंतर शहापूरात शोककळा पसरली आहे. एका तरुणाला वाचविण्यासाठी गेलेल्या इतर दोघांनाही या घटनेत आपला जीव गमवावा लागला आहे. तिघांच्या कुटुंबियांमध्ये दु:खाचे डोंगर कोसळले आहे.