लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर फाडणारे ज्या वाहनातून आलेले होते, त्या वाहनाचा क्रमांक राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केला आहे. ती गाडी कोणाची आहे, याचा आता शोध घ्या, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.

काही दिवसांपूर्वी मुंब्रा येथील मध्यवर्ती शाखा शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जमीनदोस्त केली. ही शाखा गुंडगिरी करत शिंदे गटाकडून बळकावली जात असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. तर या ठिकाणी शाखेची नव्याने उभारणी केली जात असल्याचा दावा शिंदे गटाने केला. त्याचे भूमिपूजनही पार पडले आहे.

आणखी वाचा-ठाणे : दिवाळी पहाट निमित्ताने वाहतुक बदल

या वादामुळे उद्धव ठाकरे शनिवारी मुंब्रा शहरात शाखेच्या ठिकाणी भेट द्यायला येणार आहेत. या पार्श्वभूमीवर कळवा – मुंब्रा येथील आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी उध्दव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर उभारले आहेत. बॅनरवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि काँग्रेसच्या सोनिया गांधी यांचे छायाचित्र आहेत. यातील काही बॅनर अज्ञातांनी फाडले आहेत. यावरून आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. एक होर्डिंग फाडायला किमान १५ मिनिट तरी लागतात आणि “सर्वत्र नजर असणाऱ्या” पोलिसांच्या मदतीशिवाय हे होऊच शकत नाही असा थेट आरोप त्यांनी पोलिसांवर केला आहे. त्यापाठोपाठ त्यांनी आणखी एक संदेश प्रसारित केला आहे.

आणखी वाचा-कळवा रुग्णालयात १०० परिचारिकांची भरती होणार

मुंब्रा परिसरामध्ये काल रात्री बॅनर्स फाडण्यात आले. पोलीसांना सूचना देऊनही पोलीस काहीच करु शकले नाहीत. माझं मत असं आहे की, पोलीसांचाही यामध्ये हात होता. आता पोलीसांना मी ज्या गाडीतून बॅनर्स फाडणारे आले होते, त्या गाडीचा नंबर देत आहे, असे सांगत आव्हाड यांनी MH43 1278 हा क्रमांक जाहीर केला आहे. आता बघुयात पोलीस ही गाडी शोधतात का ? आणि गाडी कोण चालवत होतं याची नोंद घेतात का ? आणि त्यांच्यावर कारवाई करतात का ? ह्याला थांबवा, त्याला थांबवा… मुंब्रा परिसरामध्ये घबराटीचे वातावरण तयार करा. दहशतीचे वातावरण तयार करा. हे करण्यापेक्षा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जे गरजेचे आहे ते पोलीसांनी करावं. ती गाडी कोणाची आहे याचा आता शोध घ्या, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.