ठाणे : मुंबई आणि ठाणे परिसरातील वाहतूक कोंडी हा नागरिकांसाठी कायम डोकेदुखीचा विषय ठरला आहे. काही मिनिटांच्या अंतराचा प्रवास तासाभरात पूर्ण होतो, हे रोजचं वास्तव आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) ठाणे जिल्ह्यात विविध प्रकल्प हाती घेतले असून त्याचबरोबर आता आणखी एका प्रकल्पाला प्राधिकरणाने हिरवा कंदील दाखविल्यामुळे ठाणे–डोंबिवली प्रवास फक्त २५ मिनिटांत होणार आहे.

मोठागाव येथील रेल्वे फाटक अनेक वर्षांपासून प्रवाशांसाठी मोठा अडथळा ठरत होता. विशेषतः डोंबिवलीहून माणकोली उड्डाणपूलमार्गे ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांना दिवा-वसई रेल्वेमार्गावरील वाहतुकीमुळे दररोज कोंडीचा सामना करावा लागतो. रेल्वे फाटक बंद असल्याने शेकडो वाहने रांगेत थांबतात आणि त्यामुळे प्रवासाचा वेळ प्रचंड वाढतो. याच समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून एमएमआरडीएने डोंबिवलीजवळील मोठागाव येथे चार-लेन उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेऊन हिरवा कंदील दिला आहे.

चार-लेन उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय

सुरुवातीला या पूलाचा आराखडा दोन लेनचा होता, मात्र वाढत्या वाहतुकीचा विचार करून चार-लेन उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पुढील काही वर्षांसाठी वाहतूक सुरळीत राहील आणि नव्याने कोंडी निर्माण होणार नाही. या प्रकल्पासाठी सुमारे १६८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी सुमारे ३० कोटी रुपये जमीन संपादनासाठी, तर उर्वरित १३८ कोटी रुपये उड्डाणपूल आणि प्रवेशमार्ग बांधकामासाठी वापरले जाणार आहेत. तसेच, या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या सुमारे ६०० रहिवाशांच्या पुनर्वसनाची जबाबदारीही एमएमआरडीए घेणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

एक तासांचा प्रवास २५ मिनिटांवर

उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर ठाणे–डोंबिवली दरम्यानचा प्रवासाचा वेळ जवळपास एक तासावरून फक्त २५ मिनिटांपर्यंत कमी होईल, असा अंदाज आहे. याशिवाय रेतीबंदर–माणकोली मार्गावरील वाहतूकही मोठ्या प्रमाणात सुकर होणार आहे. या प्रकल्पामुळे ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाहतूक कोंडी, वेळेचा अपव्यय आणि इंधन खर्च या तिन्ही समस्यांवर उपाय म्हणून हा उड्डाणपूल प्रकल्प ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.