बदलापूरः पक्षात उभी फुट सहन करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अंबरनाथ शहरात बंडखोरांविरूद्ध संघर्ष करण्याचा इशारा दिला होता. मात्र अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हावर आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर बदलापुरात पक्षाच्या वतीने ठोस निर्णय न झाल्याने काही जणांना उमेदवारी अर्जच भरता आलेला नाही. त्यात शेवटच्या क्षणाला थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संगिता चेंदवणकर यांना अपक्ष अर्ज भरण्याची वेळ आली.
नगरपालिका निवडणुका जाहीर होण्याच्या काही दिवस आधी अंबरनाथ शहरात मनसेला मोठे खिंडार पडले. मनसेचे शहर अध्यक्ष कुणाल भोईर यांच्यासह संदिप लकडे, स्वप्निल बागूल, अपर्णा भोईर या माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शहरात पक्षाला मोठा धक्का बसला होता. त्यावेळी पक्षाच्या वतीने शहराला नवा शहरप्रमुख देण्यात आला. शैलेश शिर्के यांनी शहरप्रमुख पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर पक्षाची कार्यकारिणी घोषीत केली. त्यानंतर पक्षाला बळकटी देण्यासाठी प्रयत्न करण्यात आहे. पक्ष सोडून गेलेल्यांवर विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही कार्यकर्त्यांना देण्यात आल्या होत्या.
मात्र पालिका निवडणुकांच्या अर्ज दाखल करण्याच्या पूर्वसंध्येला मनसेच्या वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक पदाधिकाऱ्यांना अधिकृतपणे चिन्हावर लढू नये असे सांगण्यात आले. त्यामुळे काही जणांचा हिरमोड झाला. त्याचवेळी शहरातील मनसे उमेदवारांनी शिवसेना ठाकरे पक्षाच्या चिन्हावर लढण्याची तयारी सुरू केली. अखेर मनसेचे १४ उमेदवार शिवसेना ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हावर लढणार आहेत. या १४ जणांनी सोमवारी अर्ज दाखल केला. मनसेचे शहरप्रमुख शैलेश शिर्के यांनी माध्यमांशी बोलताना हा वरिष्ठांशी बोलून घेतलेला निर्णय असल्याची माहिती दिली.
शहरात चिन्हावरून संभ्रम होऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती शैलेश शिर्के यांनी माध्यमांशी बोलताना दिली. आमचे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत असतील. काही ठिकाणी शिवसेना ठाकरे आणि मनसे असे एकत्रितरित्या प्रभागात उमेदवार उतरले आहेत. तर काही ठिकाणी दोन्ही उमेदवार मनसेचे आहेत, असेही शिर्के यांनी सांगितले. अंजली राऊत या शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असणार आहेत.
बदलापुरात उमेदवारांत गोंधळ
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संगिता चेंदवणकर यांना ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारी देण्यावर एकमत केल्यानंतर काही उमेदवारही मशाल चिन्हावर लढण्याची शक्यता होती. मात्र चेंदवणकर यांना पक्षप्रवेशाची अट घातल्याने काहींनी यातून पाय मागे घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांना अर्ज भरता आला नसल्याचीही माहिती आहे. तर काहींनी अपक्ष म्हणूनच अर्ज दाखल केला आहे.
