डोंबिवली – कोणी काही बोलत नाही. आवाज उठवत नाही म्हणून गुपचूप कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील मटण, मांस विक्री बंद ठेवण्याचा अजब फतवा कल्याण डोबिवली पालिकेने काढला आहे. असा फतवा काढता तर, मग शहरातील मोठी मांसाहरी हाॅटेल्स, चवीदार मांसाहरी पदार्थ विक्री करणारी मोठी व्यापारी दुकाने बंद करण्याची हिम्मत कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन १५ ऑगस्ट रोजी दाखविल का, असा प्रश्न करत मनसेचे नेते राजू पाटील यांनी पालिका प्रशासनावर टीका केली. आणि तातडीने बंदीचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे.

हा निर्णय मागे घेतला नाहीतर राष्ट्रीय दिनाच्या दिवशी नाहक पालिका, पोलीस आणि सगळ्यांच्या डोक्याला नाहक ताप होईल, असा इशारा राजू पाटील यांनी दिला आहे. स्वातंत्र्यदिनी शहरातील कत्तलखाने बंद ठेवण्याच्या निर्णयाबरोबर कल्याण, डोंबिवलीतील मटण, मांस विक्री बंद करण्याचा आदेश कल्याण डोंबिवली पालिकेच्या बाजार व परवाना विभागाने शासनाच्या १९८७ चा आदेश आणि पालिकेचा डिसेंबर १९८८ च्या प्रशासकीय ठरावाप्रमाणे काढला आहे. या आदेशावरून कल्याण डोंबिवलीसह ठाणे, मुंबईतील राजकीय नेत्यांनी पालिकेवर टीकेचे झोड उठवली आहे.

याविषयावर भाजप, शिंदे शिवसनेचे नेते गुपचिळी धरून आहेत. मनसेनेही दोन दिवसांपासून या विषयावर मौन धरले होते. पण मनसेचे नेते राजू पाटील यांनी मंगळवारी आक्रमक भूमिका घेत मटण, मांस विक्री करणारा वर्ग हा सामान्य कुटुंबातील आहे. अनेकांची उपजीविका या व्यवसायावर अवलंबून आहे. अनेकांच्या आहारातील हा नेहमीचा घटक आहे. त्यामुळे कोणी काय खावे आणि खाऊ नये हे पालिका आयुक्त ठरविणारे कोण. त्यांना हा अधिकार कोणी दिला आहे, असे प्रश्न राजू पाटील यांनी केले आहेत.

मटण मांस विक्री करणारा वर्ग शांत राहतो म्हणून पालिका प्रशासन काहीही निर्णय घेणार असेल तर ते अजिबात सहन केले जाणार नाही. तुम्ही सामान्य वर्गाच्या मटण विक्री दुकानांवर बंदी आणता. मग मांसाहर विक्री करणारी शहरातील मोठी व्यापारी दुकाने बंद करण्याची तुमची हिम्मत आहे का, असा प्रश्न राजू पाटील यांनी पालिका प्रशासनाला केला आहे.

महाराष्ट्रात २९ महापालिका आहेत. कल्याण डोंबिवली पालिकेच्या आसपास उल्हासनगर, भिवंडी, ठाणे, नवी मुंबई पालिका आहेत. त्या पालिकांनी असा काही आदेश काढल्याचे ऐकीवात नाही. मग कल्याण डोंबिवली पालिकेला रस्ते, खड्डे, वाहतूक कोंडी, रखडलेले स्मार्ट सिटीसारखे प्रकल्प मार्गी लावण्याऐवजी ही मटण विक्री बंद करण्याची सुबुध्दी कुठुन सुचली, असा प्रश्न राजू पाटील यांनी केला आहे. श्रावण सणांचा महिना आहे.

या महिन्यात शक्यतो लोक शाकाहरी खाणे पसंत करतात. तरीही काहींना मांसाहर करायचा असेल तर त्यांना खाऊन द्या. त्यांना अडविणारी पालिका कोण. पालिकेने तातडीने आपला फतवा मागे घ्यावा, अन्यथा मनसे पध्दतीने फतव्याला प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.