औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिकेची निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला असला तरी अंबरनाथ व बदलापूर नगरपालिकेची निवडणूक मनसे लढविणार असल्याची माहिती पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.
अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक पक्षाने लढवावी, अशी येथील कार्यकर्त्यांची मागणी आहे. गेल्यावेळी अंबरनाथ नगरपालिकेत मनसेचे सहा नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे अंबरनाथ येथे नवी मुंबईचा न्याय लावला जाणार नाही, असे येथील मनसेच्या नगरसेवकांचे म्हणणे आहे.
नवी मुंबईत पक्षाची अवस्था अगदीच तोळामासा बनली आहे. पालकमंत्री गणेश नाईक यांच्या कलेने जाणारे निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अगदी सुरुवातीपासून घेतल्याने नवी मुंबईत मनसेची ताकद फारशी वाढलीच नाही.
अंबरनाथ शहरात मात्र तसे चित्र नाही. त्यामुळे येथे मनसेमार्फत निवडणूक लढवली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. या वृत्तास मनसेचे नगरसेवक व स्थानिक नेते  स्वप्नील बागुल यांनी दुजोरा दिला. येत्या दोन दिवसांत शहरातील मनसे उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बदलापुरात शिवसेनेशी युती होणार नाही’
बदलापूरात मनसेची शिवसेनेसोबत युती होणार असल्याच्या वावडय़ा उठत आहेत. परंतु हे वृत्त निराधार असल्याचे मनसेचे येथील एकुलते एक नगरसेवक विकास गुप्ते यांनी स्पष्ट केले. गेल्या निवडणुकीदरम्यान मनसेचे येथे तीन नगरसेवक निवडून आले होते. राज ठाकरे यांनी शहरात सभा देखील घेतली होती. परंतु, बदलत्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेत पक्षाचा एक नगरसेवक भाजपमध्ये तर दुसरा शिवसेनेत गेला.

संकेत सबनीस, अंबरनाथ

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns to contest municipal election