यंदा ठाण्याच्या जांभ‌ळीनाक्यावरील दहीहंडीत निष्ठेचे थर ; खासदार विचारे यांचा शिंदे गटावर अप्रत्यक्ष निशाणा

शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाकरे यांच्यासोबत राहिलेले खासदार राजन विचारे यांनी ठाण्यातील जांभळीनाका भागात दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे.

यंदा ठाण्याच्या जांभ‌ळीनाक्यावरील दहीहंडीत निष्ठेचे थर ; खासदार विचारे यांचा शिंदे गटावर अप्रत्यक्ष निशाणा

ठाणे : शिवसेनेतील बंडखोरीनंतर पहिल्यांदाच साजरा होणाऱ्या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने ठाण्यात ठाकरे आणि शिंदे गटांकडून शक्तीप्रदर्शन केले जाणार असल्याचे चित्र असतानाच, ठाकरे समर्थक खासदार राजन विचारे यांनी यंदा ठाण्याच्या जांभ‌ळीनाक्यावरील दहीहंडीत निष्ठेचे थर लावणार असल्याचे सांगत शिंदे गटावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. सध्याच्या राजकीय घडामोडीत केवळ निष्ठावंत पक्षात राहिले असून खासकरून ठाण्यात निष्ठा दाखवने गरजेचे आहे. त्यामुळेच हंडीत निष्ठेचे थर लावण्यात येणार असल्याचे विचारे यांनी म्हटले आहे.

करोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे राज्य शासनाने सण, उत्सवांवरील निर्बंध हटविले आहेत. त्यामुळे यंदा दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला असून ठाण्यात राजकीय पक्षांच्या नेत्यांनी यंदा दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. या उत्सवाच्या निमित्ताने ठाणे शहरात शिंदे आणि ठाकरे गटाकडून शक्तीप्रदर्शन केले जाणार असल्याचे चित्र दिसून येते. शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाकरे यांच्यासोबत राहिलेले खासदार राजन विचारे यांनी ठाण्यातील जांभळीनाका भागात दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे.

हेही वाचा >>> Maharashtra Latest News Live: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

या उत्सवात मुंबईतील पथकाला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने १ लाख ११ हजार १११ रुपये, ठाण्यातील गोविंदा पथकाला आनंद दिघे यांच्या नावाने १ लाख ११ हजार १११ रुपये आणि महिला पथकाला मिनाताई ठाकरे यांच्या नावाने ५१ हजार रुपयांचे बक्षिस दिले जाणार असल्याची माहिती विचारे यांनी दिली. या सोहळ्यात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह पक्षाचे आमदार आणि खासदार उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या उत्सवात निष्ठेचे थर, एकतेचा बाज, संस्कृतीचा साज आणि हिंदूत्वाचा आवाज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्याच्या राजकीय घडामोडीत केवळ निष्ठावंत पक्षात राहिले असून खासकरून ठाण्यात निष्ठा दाखवने गरजेचे आहे. त्यामुळेच हंडीत निष्ठेचे थर लावण्यात येणार असल्याचे सांगत त्यांनी शिंदे गटावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. टेंभीनाक्यावर धर्मवीर आनंद दिघे यांनी दहीहंडी उत्सव सुरु केला असून त्याचबरोबर जांभळीनाक्यावर दिघे यांच्याच आर्शीवादाने दहीहंडी उत्सव होत आहे. दोन्ही उत्सव हे आमचेच असून दोन्ही ठिकाणचे उत्सव गुण्यागोविंदाने साजरे होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mp rajan vichare s indirect target on shinde group over dahi handi celebration zws

Next Story
यंदा ठाण्यात राजकीय दहीहंड्यांचा थरार
फोटो गॅलरी