ठाणे : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) कडून देण्यात आलेली मान्यता रद्द होण्याची भितीने दादोजी कोंडदेव क्रीडापेक्षागृहातील मैदानात यापुढे सिझन (लेदर) बॉल क्रिकेट स्पर्धांनाच परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापाठोपाठ आता मुंब्रा येथील भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद क्रीडा संकुलातील करोना केंद्रची जागा क्रिकेट सरावासाठी तात्पुरत्या स्वरूपात मुंबई क्रिकेट असोसिएशनला भाडे तत्वावर देण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे. प्रति खेळपट्टी, प्रति महिना आणि प्रति सत्राकरीता १० हजार रुपये इतके भाडे आकारले जाणार आहे.

मुंब्रा परिसरातील अनेक तरुणांना क्रिकेटची आवड आहे, परंतु सुस्थितीत असलेल्या खेळाचे मैदान नसल्यामुळे, त्यांना सराव आणि कौशल्य सुधारण्याच्या संधी मर्यादित आहेत. इच्छुक क्रिकेटपटूंना प्रशिक्षण आणि स्पर्धा करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन यांनी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद क्रीडा संकुलातील करोना केंद्र येथील जागा क्रिकेट सरावासाठी खेळपट्टी तयार करून प्रशिक्षण देण्यासाठी कायमस्वरुपी उपलब्ध देण्याची विनंती केली होती. या प्रस्तावास ठाणे महापालिकेच्या प्रशासकीय सभेने मान्यता दिली आहे. या उपक्रमाचा फायदा केवळ स्थानिक खेळाडूंनाच होणार नाही, तर निरोगी खेळ आणि सामुदायिक सहभागालाही प्रोत्साहन मिळेल. या जागेत क्रिकेट खेळपट्टी करण्यासाठीचा आवश्यक सर्व खर्च मुंबई क्रिकेट असोसिएशन करणार आहे. त्यामुळे महापालिकेवर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही, असा दावा प्रशासनाने केला आहे.

क्रिकेट सुविधा नव्हती

ठाणे महापालिकेमार्फत मुंब्रा क्षेत्रात भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद क्रीडा संकुल उभारण्यात आलेले आहे. यामध्ये ॲथलेटिक्स, फुटबॉल, लॉन टेनिस, बास्केटबॉल, स्विमिंग बॅटमिंटन इत्यादी खेळ सुविधा निर्माण करण्यात आल्या. परंतु या संकुलात क्रिकेट खेळासाठी कोणत्याही सुविधेचा समावेश करण्यात आला नव्हता.

असे ठरविले दर

या संकुलात क्रिकेट खेळासाठी कोणत्याही सुविधेचा समावेश नसल्यामुळे क्रिकेट खेळपट्टी वापरासाठीचे सुविधेकरीता दर निश्चित नव्हते. त्यामुळे दादोजी कोंडदेव क्रिडाप्रेक्षागृहातील खेळपट्टी सुविधेसाठी ठाणे महापालिकेने केलेल्या ठरावानुसार दर आकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यानुसार, क्रिकेट खेळपट्टी प्रति खेळपट्टी, प्रति महिना आणि प्रति सत्राकरीता १० हजार रुपये या प्रमाणे भाडे आकारले जाणार आहे.

तात्पुरत्या स्वरूपात जागा देण्याचे कारण

भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद क्रिडा संकुलात करोना काळात तात्पुरत्या तयार करण्यात आलेल्या रुग्णालयाची जागा मोकळी आहे. या जागेवर बहुउद्देशीय सुविधा केंद्र निर्माण करण्याची मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रानद्वारे केली आहे. यामुळे या जागेत बहुउद्देशीय सुविधा केंद्र निर्माण करण्याबाबतची कार्यवाही संबंधित विभागाकडून प्रस्तावीत आहे. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशन यांच्या मागणीनुसार क्रिकेट खेळपट्टीसाठी कायमस्वरुपी जागा उपलब्ध करणे शक्य होणार नाही. परंतु ठाणे महानगरपालिकेच्या अर्थिक हित विचारात घेता तात्पुरत्या स्वरुपात सदर जागा उपलब्ध करता येऊ शकते. यामुळे पालिकेने हा निर्णय घेतला आहे, असे प्रस्तावात म्हटले आहे.