बदलापूरः मुरबाड तालुक्यातील मतदार यादीत वाढलेल्या गोंधळावर प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. तालुक्यातील प्रत्येक गावात होणाऱ्या ग्रामसभांमध्ये या मतदार याद्यांचे जाहीर वाचन करण्याचे आदेश तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी पंचायत समितीला दिले आहेत. त्यामुळे मृत, दुबार मतदारांची नावे सर्व ग्रामस्थ पाहू शकणार आहेत. त्यावर तात्काळ अंमलबजावणीची अपेक्षा आहे.

देशात गेल्या काही दिवसात कॉंग्रेसच्या वतीने मतचोरीच्या नावाने निवडणूक आयोगाविरूद्ध मोठी मोहिम उघडली आहे. सध्या बिहारमध्ये कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी याच विषयावर यात्रा काढत आहेत. यापूर्वीही अनेक वेळा राहूल गाधी यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर विविध मतदारसंघांमध्ये मतदानाच्या दिवसाबाबत आणि मतदार यादीबाबत तक्रारी समोर आल्या होत्या.

अलीकडेच तालुक्यातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर बोगस नावे समाविष्ट झाल्याची तक्रार केली होती. अनेक मृत व्यक्तींची नावे अद्याप यादीत असल्याचे, तर काही जण कायमचे गाव सोडून गेले तरीही त्यांची नावे यादीतून वगळलेली नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये बोगस मतदानाची शक्यता वाढल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करत मुरबाड तालुका तहसील प्रशासनाने मतदार यादी शुद्धीकरण मोहीम सुरू केली आहे. ग्रामसभांमध्ये यादीचे वाचन करून नागरिकांकडून त्रुटी निदर्शनास आणून देण्याचे आवाहन तहसील कार्यालयाने केले आहे. गावागावांतील नागरिकांनी ग्रामसभांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून चुकीची माहिती, मृत किंवा कायम स्थलांतरित व्यक्तींची नावे यादीतून वगळण्यासाठी सहकार्य करावे. या मोहिमेचा उद्देश मतदार यादी अधिक पारदर्शक आणि अचूक बनवणे हा आहे, अशी माहिती मुरबाडचे तहसिलदार अभिजीत देशमुख यांनी दिली आहे.

  • यादीत असलेले मुख्य गोंधळ
  • मृत व्यक्तींची नावे यादीत कायम
  • स्थलांतरीत झालेल्या कुटुंबांची नावे अद्याप कायम
  • काही मतदारांची नावे दुबार नोंदवलेली
  • नव्या मतदारांच्या नावांच्या नोंदीत उशीर

निर्णयाचा फायदा काय?

मुरबाड तहसील कार्यालयाने दिलेल्या आदेशानुसार आता पंचायत समिती ग्रामसभा आयोजीत करून त्या सभेत मतदार याद्यांचे वाचन केले जाणार आहे. या ग्रामसभांची माहिती किमान १० दिवस आधी ग्रामस्थांना द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. जेणेकरून अधिकाधिक ग्रामस्थ या सभांमध्ये सहभागी होतील. याद्यांचे जाहीर वाचन झाल्याने तात्काळ त्या यादीतील घोळावर आक्षेप घेता येतील. त्यामुळे दुबार, मृत व्यक्तींची नावे तात्काळ काढता येतील, अशी आशा आहे.