ठाणे : सुभाषनगर तसेच गांधीनगर परिसरातील झोपड्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षणास विरोध करत स्थानिक रहिवाशांनी मंगळवारी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढला होता. मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी सर्वेक्षणाला तीन महिन्यांची स्थगिती देण्याची मागणी केली होती. यानंतरही बुधवारी नळपाडा भागात बायोमेट्रिक सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना स्थानिक नागरिकांनी पिटाळून लावले.

नळपाडा झोपडपट्टीतून ओमकाली एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेतर्फे ४५१ आणि निळकंठेश्वर एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेतर्फे ५४१ सदस्यांनी एका विकासकाची निवड केली होती. या निवडीचा प्रस्ताव त्यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. या दोन्ही संस्थांबाबत तसेच या संस्थांचे पदाधिकारी आणि सदस्य कोण आहेत, याबाबत रहिवाशांना पुरेशी माहीती नसल्याचा दावा करत स्थानिक नागरिकांनी एसआरए कार्यालयावर मोर्चा काढला होता. तसेच झोपडपट्टयांचे सर्वेक्षण स्थगित करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी मोर्चा काढला होता. सात ते आठ वर्षांपासून पुनर्विकास रखडविणाऱ्या बिल्डरचीच विकासासाठी निवड झाली असून त्यास विरोध असल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात आले.

नळपाडा झोपडपट्टीतील अनेक कुटुंबे नोकरी-व्यवसायानिमित्ताने अन्य ठिकाणी तात्पुरती स्थलांतरित झाली आहेत. झोपडपट्टीतील अनेक कुटुंबांना घराचा पुरावा सादर करण्यासाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. झोपडपट्टीतील काही कुटुंबांनी आपली घरे भाड्याने दिली आहेत. त्यामुळे मूळ घरमालकांपर्यंत माहिती पोचलेली नाही. त्यामुळे सर्वेक्षण पुढे ढकलावे, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात आली होती. नळपाड्यालगतच्या गांधीनगर, सुभाषनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील बिल्डरचीच पुनर्विकासासाठी निवड करण्यात आली आहे.

याबाबत दोन्ही संस्थांच्या सर्वसाधारण सभा कधी झाल्या, याची माहिती नागरिकांना मिळालेली नाही. तर गांधीनगर आणि सुभाषनगरमधील विस्थापित कुटुंबांना भाडे वेळेवर मिळत नाही. अशा परिस्थितीत नळपाड्यातील नागरिकांची फरपट होऊ नये, यासाठी आम्ही लढा देणार आहोत, अशी भूमिका नागरिकांकडून मांडण्यात आली होती. दरम्यान, झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करून घ्यावे, अशी समजूत एसआरए अधिकाऱ्यांनी मोर्चेकरांची काढली होती. यानंतरही मोर्चेकरी आपल्या भुमिकेवर ठाम होते. असे असतानाच, बुधवारी नळपाडा भागात बायोमेट्रिक सर्वेक्षणासाठी काही कर्मचारी गेले होते. या कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षणाच्या कामाला सुरूवात करताच स्थानिक नागरिकांनी विरोध करत त्यांना तेथून पिटाळून लावले. याप्रकारामुळे झोपडपट्टी सर्वेक्षणाविरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झाल्याचे चित्र असून त्यावर आता एसआरए अधिकारी काय भुमीका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.