नवी मुंबई : नवी मुंबई शहराची उभारणी करण्यात महत्वाची संस्था मानल्या जाणाऱ्या सिडकोच्या वतीने नवी मुंबईतील पनवेल, खारघर, उलवे, तळोजा अशा विविध ठिकाणी १ लाख सदनिकांची उभारणी केली आहे. मात्र, या स्वप्नपूर्तीच्या घरातील पायाभूत सुविधांचा अभाव दिसू लागला आहे. ऐन दिवाळीत पनवेल परिसरातील नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
सिडकोच्या वतीने पनवेल परिसरात खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजा, उलवे या परिसरात एक लाख घरांची उभारणी केली आहे. याच सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीत महत्वाची भूमिका बजावली आहे. येत्या काळात आणखी एक लाख घरांची उभारणी करण्याचा सिडकोचा मानस आहे. त्यामध्ये खारघर येथे ५० हजार घरे, तळोजामध्ये २५ हजार, कळंबोली मध्ये १० हजार तर उलवे येथे १५ हजार सदनिका यांचा समावेश आहे. असे असले तरी आता बांधण्यात आलेल्या घरांमध्ये मात्र पायाभूत सुविधांचा अभाव दिसू लागला आहे. ऐन दसरा दिवाळीच्या दिवसात या घरातील नागरिकांना पाणी पुरवठा होत नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.
नागरिक संतप्त
ऐन दिवाळीत पाण्यासाठी तरसत होतो. दुसऱ्यांच्या घरी जाऊन पाणी मागितले आहे. एवढा पाऊस पडला ते पाणी सिडकोने काय केले ? सिडको हे पाणी इतर बांधकामसाठी विकत असणार आहे. सिडको चोर आहे आणि ते पाणी विकत आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. तर ही स्वप्नपूर्तीची घरं म्हणून देण्यात आली होती. स्वप्न पाहून सर्वांनी कर्ज काढून घरे घेतली. करारामध्ये २४ तास पाणीपुरवठा असणार असे नमूद करण्यात आले होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देखील पाणी नव्हते. सिडकोला जर स्वप्न पूर्ती करायची असेल तर पाणीपुरवठा करावा असे देखील नागरिकांनी सांगितले.
महाविकास आघाडी, मनसे आक्रमक
पनवेल परिसरात सिडकोच्या नियोजनशून्य कारभारामुळे लाखो रहिवासी पाण्यापासून वंचित आहेत. ऐन सणासुदीच्या काळात त्यांचे पाण्यावाचून हाल झाले. ‘जो पर्यंत येथील नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत नवीन बांधकामांसाठी नवीन सीसी, नवीन ओसी द्यायचं बंद करा’, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. खारघर, तळोजा, कामोठे आणि उलवे यांसारख्या परिसरात ही परिस्थिती गंभीर असून, कोट्यवधींचे प्रकल्प उभारणाऱ्या सिडकोला नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात अपयश आल्याचा आरोप केला जात आहे. एकीकडे पंतप्रधान आवास योजनेतील घरांना पाणी नाही, तर दुसरीकडे खाजगी बिल्डरांना पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. या समस्येमुळे मनसेनेही सिडकोला पायाभूत सुविधांवर आधी लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे.
