Navi Mumbai International Airport : ठाणे : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचे नोटीफिकेशन २३ तारखे पर्यंत निघाले नाही. तर लाखोंच्या संख्येने विमानतळावर जाऊ. दि. बा. पाटील यांचे नाव लावले नाही ना.. तर उद्घाटन करुन दाखवा. आमचे पाच हुतात्मे झालेत आणखी १५ व्हायला पण तयार आहोत. सरकारचे १२ वाजवून टाकू असा इशारा राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी दिल्यानंतर आता भाजपच्या गोटातूनही प्रतिक्रिया उमटू लागली आहे. नामकरणाचा संघर्ष सुरु होता, तेव्हा हे कुठे होते, आमच्या हजारो तरुणांनी अंगावर गुन्हे घेतले अशी टीका आमदार महेश बालदी यांनी बाळ्या मामांवर केली.
नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले आहे. या विमानतळाचे उद्घाटन लवकरच होणार आहे. या विमानतळाला माजी खासदार दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून भूमिपुत्रांकडून केली जात आहे. परंतु केंद्रीय स्तरावर हालचाली होत नसल्याने रविवारी खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली एक रॅली भिवंडी ते नवी मुंबईतील (Navi Mumbai International Airport) जासई पर्यंत काढण्यात आली. त्यानंतर एक मेळावा झाला. या मेळाव्यात म्हात्रे यांनी सरकारला थेट इशारा दिला होता.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचे नोटीफिकेशन २३ तारखे पर्यंत निघाले नाही. तर लाखोंच्या संख्येने विमानतळावर जाऊ. दि. बा. पाटील यांचे नाव लावले नाही ना.. तर उद्घाटन करुन दाखवा. आमचे पाच हुतात्मे झालेत आणखी १५ व्हायला पण तयार आहोत. सरकारचे १२ वाजवून टाकू. आम्ही कायद्याने मागत आहोत. आमचा हक्क मागत आहोत, भीक मागत नाही म्हात्रे म्हणाले होते. तसेच ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हा ठरवेल त्या दिवशी मुंबई बंद होईल असा इशाराही त्यांनी दिला होता.
म्हात्रे यांच्या टिकेला बालदींचे प्रत्युत्तर
– खासदार म्हात्रे यांच्या इशाऱ्याला भाजपचे उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी प्रत्युत्तर दिले. ज्यावेळी नामकरणाचा संघर्ष सुरु होता. आमच्या येथील हजारो तरुणांनी गुन्हे अंंगावर घेतले. तेव्हा हे नव्हते. त्यांनी पत्र दिले असले तरी यांची केंद्र आणि राज्यात सत्ता नाही. यांनी आता पर्यंत किती धावपट्ट्या उखडल्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव दिले जाणार असे म्हटले आहे. ३० तारखेच्या आधी या विमानतळालाचे नामकरण व्हावे ही जनभावना आहे. त्याबाबत आम्ही केंद्र सरकारला कळविले आहे. नामकरण केव्हा होणार हे लवकरच कळेल असे बालदी म्हणाले.
बाळासाहेबांचे नाव द्यावे त्यासाठी हेच आग्रही होते
– राष्ट्रवादी, ठाकरे यांची शिवसेना बाळासाहेबांचे नाव द्यावे यासाठी आग्रही होते. तेव्हा महाविकास आघाडी होती. बाळासाहेबांचे नाव न देता दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे हे संघर्षातून आम्ही आणले. स्वत:चे अस्तित्त्व दाखविण्याची आता त्यांची केविलवानी धडपड आहे असा आरोपही बालदी यांनी केला.
भूमिपुत्रांना नोकऱ्या
– नवी मुंबई विमानतळावर एक हजार तरुणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. भूमिपुत्रांशिवाय या विमानतळावर इतर कोणालाही नोकऱ्या दिल्या जाणार नाहीत असा दावा बालदी यांनी केला.