ठाणे : निवडणूका जसजशा जवळ येतात. तशा निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेल्या प्रतिनिधींकडून मतदारसंघतील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना आखल्या जातात. आषाढ आमावस्यापूर्वी अनेकांनी आज, अनेकांनी मांसाहाराचा बेत घरी आखला असेल. हाच विचार करुन नवी मुंबई येथे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क आधार कार्ड दाखवा, मोफत चिकन मिळवा हा उपक्रम सुरु केला होता. नवी मुंबईतील नेरुळ भागात हा चिकनचा पॅटर्न राबविण्यात आला. नागरिकांचीही चिकन मोफत मिळत असल्याने गर्दी झाली होती.
गेल्याकाही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लागलेल्या नाही. या निवडणूका दिवाळी नंतर किंवा डिसेंबरमध्ये लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता निवडणूका लढविण्यास इच्छूक असणाऱ्यांनी अनेक क्लृप्त्या लढविण्यास सुरुवात केली आहे. गणेशोत्सव तोंडावर आल्याने आता काहीजण कोकणात जाणाऱ्यांच्या नोंदणी करत आहेत. गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांना मुंबई, ठाण्यातून मोफत बसगाड्या उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर, काहीजण दिवाळीमध्ये आपल्या मतदारसंघातील नागरिकांना काय वाटप करावे याचा आराखडा तयार करत आहे.
दरम्यान, गुरुवारी आषाढ आमावस्या असल्याने बुधवारी अनेकांनी घरामध्ये मांसाहाराचा बेत आखला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात मतदारसंघातील नागरिकांना मोफत चिकन वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आले आहे. नवी मुंबईतही ठाकरे गटाने आखाड निमित्ताने २५०० किलो चिकनचे मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबईतील शिवसेनेचे (ठाकरे गट) विशाल ससाणे आणि ठाकरे गटाच्या महिला संघटिका पौर्णिमा ससाणे यांनी हा कार्यक्रम आखला आहे.
नेरुळ येथील सेक्टर २, ४ आणि २१, २२, २३, २४, २५ जुई पाडा गाव, जुईनगर या नागरिकांसाठी हा कार्यक्रम होता. सकाळी ९ ते दुपारी १२ या तीन तासांसाठी हा उपक्रम होता. चिकन देताना एक अट घालण्यात आली होती. त्यामध्ये आधारकार्डची प्रत मागविण्यात आली होती. तेथील एका चिकन दुकानात जाऊन ती प्रत दाखविल्यानंतर चिकन मोफत मिळत होते. मोफत चिकन मिळत असल्याने अनेकांनी चिकन घेण्यासाठी गर्दी केली होती.
ठाण्यात देखील गणेशोत्सवानिमित्ताने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची नोंदणी केली जात आहे. निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर असे अनेक उपक्रम आता सुरु होतील असे ठाणे, नवी मुंबईतील रहिवासी सांगतात. जस-जशी निवडणूक जवळ येईल त्यानंतर मतदारांना प्रलोभने दाखविली जातात. परंतु लोकप्रतिनिधींनी निवडून आल्यानंतर जनतेची कामे करावी. जनता निवडून देईल असे नागरिकांचे म्हणणे आहे.