ठाणे- शहरात गुरूवारी म्हणजेच अनंत चतुर्दशी दिवशी गणपती विसर्जनासाठी निघालेल्या मिरवणूकांदरम्यान आवाजाची पातळी ९० ते १०० डेसिबल पर्यंत पोहोचली होती. पाच दिवसांच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत डिजेचा वापर मोठ्या प्रमाणात असल्याने आवाजाची पातळी जास्त होती तर, अनंत चतुर्दशीच्या दिवशी डिजेचे प्रमाण कमी होते. यामुळे पाच दिवसाच्या विसर्जन मिरणूकांच्या तुलनेत अनंत चतुर्दशी दिवशी आवाजाची पातळी कमी असल्याचे दिसून आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ठाणे खाडीत गणेश मुर्तीचे विसर्जन सुरुच; पर्यावरणप्रेमींकडून नाराजी

ठाणे शहरात दहा दिवसाच्या गणरायाला गुरुवारी नागरिकांनी मनोभावे निरोप दिला. गणपती विसर्जनावेळी निघालेल्या मिरवणुकांमध्ये आवाजाच्या पातळीची मर्यादा ओलांडल्याचे दिसून आले. अनेक सार्वजनिक मंडळाच्या गणपतीचे विसर्जन अंनत चतुर्दशीला होते. अशा मंडळांची संख्याही मोठी आहे. या विसर्जनावेळी ढोल-ताशे, बॅन्जो, डीजे इत्यादी वाद्यांच्या दणदणाटात मिरवणुका निघाल्या होत्या. परंतू, यंदा सार्वजनिक गणपतीच्या मिरवणुकांमध्ये डीजेचे प्रमाण कमी तर, ढोल- ताशे आणि बॅन्जोचे प्रमाण सर्वाधिक दिसत होते. ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते डाॅ. महेश बेडेकर यांनी शहराच्या अनेक भागात मिरवणुकांदरम्यान आवाजी पातळीचे यंत्राद्वारे मापन केले. यामध्ये राम मारुती रोड, गोखले रोड, मल्हार सिनेमागृह, विष्णू नगर, साईबाबा मंदिर, तीन पेट्रोल पंप, चरई, ठाणे महापापालिका मुख्यालय, पाचपाखाडी, उपवन, पोखरण रस्ता क्रमांक २, जे. के. शाळा कॅडबरी जंक्शन या परिसरात सर्वाधिक ध्वनी प्रदूषण झाल्याचे आढळून आले आहे. शहरात गुरुवारी दुपारी तीन वाजता पाऊस सुरू झाला. सायंकाळी पावसाचा जोर कमी झाल्यावर अनेक गणपती विसर्जन मिरवणुका निघाल्या. या मिरवणुका मध्यरात्री २ वाजेपर्यंत सुरु होत्या. या कालावधीत आवाजाच्या पातळीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यामध्ये सर्वाधिक ध्वनी प्रदुषण हे ठाणे महापालिका मुख्यालय आणि पाचपाखाडी परिसरात झाले होते. याठिकाणी १०० ते ११० डेसीबल इतकी आवाजाची पातळी नोंदवण्यात आली होती.

पाच दिवसाच्या गणपती विसर्जन मिरवणूकीत डीजेचा वापर सर्वाधिक

पाच दिवसाच्या गणपती विसर्जन मिरवणूकीत डीजेचा वापर सर्वाधिक करण्यात आला होता. तर, अनंत चतुर्दशी दिवशी ढोल- ताशे आणि बॅन्जो चा वापर दिसून आला. डीजे च्या तुलनेत ढोल – ताशे आणि बॅन्जोच्या वापराने ध्वनी प्रदुषण कमी होते. यामुळे पाच दिवसाच्या विसर्जन मिरवणुकांच्या तुलनेत अनंत चतुर्दशी दिवशी आवाजाची पातळी काही प्रमाणात कमी होती, असे डॉ. महेश बेडेकर यांनी सांगितले.

आवाजाच्या पातळीचा अहवाल

ठिकाण                          वेळ                         डेसीबल

राम मारुती रोड                रात्री १०.१५ वाजता             ९०-९५

गोखले रोड                    रात्री १०.३० वाजता             ९०-९५

मल्हार सिनेमागृह               रात्री १०.३० वाजता             ९०-९५

विष्णू नगर                     रात्री १०.४० वाजता              ८५-९०

साई बाबा मंदिर                रात्री १०.५० वाजता              ९०-९५

तीन पेट्रोल पंप                  रात्री १०.५० वाजता             ९०

चरई                          रात्री १० वाजता               ९५-१००

पाचपाखाडी                     रात्री १०.३० वाजता             १००-११०

उपवन                         रात्री १०.४५ वाजता             ७५-८०

पोखरण रोड क्र.२                 रात्री १०.५५ वाजता            ९५ -१००

जे.के शाळा कॅडबरी जंक्शन        रात्री ११ वाजता                ९०-९५

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Noise level reached 90 to 100 decibels during ganesh immersion processions in thane zws