कल्याण – नारळी पौर्णिमेनिमित्त शहरांच्या विविध भागात रस्ते अडवून निघालेल्या मिरवणुका. पावसाने अचानक लावलेली हजेरी. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे पाण्याने भरले. तीन दिवस सलग सुट्ट्या आल्यामुळे एकाच वेळी एकाच दिवशी नागरिक अधिक संख्येने पर्यटन, समुह पध्दतीने आपल्या बहिणीच्या घरी रक्षाबंधन करण्यासाठी निघालेले. या सगळ्या एकाचवेळी घडलेल्या घटनांनी शुक्रवारी संध्याकाळपासून कल्याण शहर, कल्याण शीळ रस्ता, पनवेल ते डोंबिवली रस्ता वाहनांनी जाम झाला.
मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरील वाहने कोंडीत अडकल्याने या रस्त्यांच्या पोहच रस्त्यावरील अंतर्गत मार्ग वाहनांनी गजबजून गेले. पर्यायी रस्ते मार्गाने जाण्याचा प्रयत्न वाहन चालकांनी केला. हे रस्तेही कोंडीने भरले होते. त्यामुळे कल्याण डोंबिवली भागातून नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पनवेल भागात जाणारा आणि पनवेल, नवी मुंबई, ठाण भागातून येणारा प्रवासी चार ते पाच तास जागोजागीच्या कोंडीने अडकून पडला होता. लहान मुले, महिलांचे यामध्ये सर्वाधिक हाल झाले.
सणांचे दिवस आणि त्यात कोंडीमुळे अडकून पडावे लागल्याने प्रवासी संताप व्यक्त करत होते. अनेक प्रवासी लोणावळा, अलिबाग भागात पर्यटनासाठी निघाले होते. त्यांनाही या कोंडीत अडकावे लागले. कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी वेगवान दुचाकी स्वारांनी रस्त्याच्या कडेने, कच्च्या रस्त्याने वाहने चालवून कोंडीत आणखी भर घातली. दुचाकी स्वार जागोजागी मोटार, अवजड वाहनांना आडवे आल्याने मोठ्या वाहनांना पुढे सरकता येत नव्हते.
पनवेल ते डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई परिसरात जाताना प्रत्येक रस्ते, चौक भागात वाहतूक पोलीस तैनात नसतात. त्याचा गैरफायदा अनेक वाहन चालकांनी शुक्रवारी घेतला. त्यांनी वाहने विरुध्द मार्गिकेतून टाकून वाहने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. समोरून येणारी वाहने आणि विरुध्द मार्गिकांमधील वाहनांनी रस्ते आणखी जाम झाले.
वाहतूक पोलिसांची ही कोंडी सोडविताना दमछाक झाली. अनेक वेळा वाहतूक पोलीस आपल्या चौकीत मोबाईलवर वेळकाढूपणा करत बसतात. रस्त्यावर वाहतूक कोंडी सुरू झाली की मग हे वाहतूक पोलीस चौकीतून बाहेर येऊन वाहतुकीचे नियोजन करण्यास सुरूवात करतात. तोपर्यंत रस्ता वाहनांनी जाम झालेला असतो. ही कोंडी प्रवाशांना त्रासदायक होते.
कल्याण शीळ रस्ता, डोंबिवली तळोजा पनवेल रस्त्यावर दिवसा अवजड वाहनांना प्रतिबंध आहे. रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत ही वाहने या रस्त्यावरून धाऊ शकतात. तरीही अनेक ठिकाणी वाहतूक पोलीस अवजड वाहन चालकांशी हातमिळवणी करून ही वाहने तळोजा, पनवेल, भिवंडी बाह्यवळण रस्ता, पडघा, कल्याण रस्ते मार्गाने दिवसा शहरात सोडतात. ही वाहने मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर आली की या अवजड वाहनाच्या पाठीमागील वाहने संथगतीने धावण्यास सुरूवात होते. येथून कोंडीला सुरूवात होते.
शुक्रवारी कल्याणमध्ये बाजार समिती ते शिवाजी चौक दरम्यान एक अवजड ट्रक मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर उभा करून ठेवण्यात आला होता. या वाहनांचा इतर वाहनांंना अडथळा आल्याने या भागात वाहतूक कोंडी झाली होती.