कल्याण - रविवारी रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने मुंबई, ठाणे शहर परिसराला झोडपून काढले. या पावसाने भांडुप, कुर्ला रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे मार्ग पाण्याखाली गेले. त्यामुळे सोमवारी सकाळीच कामावर निघालेल्या प्रवाशांना आपण मिळेल त्या लोकलने मुंबईत कामाच्या पहिल्याच दिवशी पोहोचू असे वाटले, पण कल्याण, डोंबिवली, विठ्ठलवाडी, ठाकुर्ली, टिटवाळा रेल्वे स्थानकांमध्ये आल्यावर प्रवाशांना मुंबईला जाणाऱ्या लोकल अनियमित वेळेने धावत असल्याचे आणि येणाऱ्या लोकल प्रवाशांनी खचाखच भरलेल्या असल्याने बहुतांंशी प्रवाशांनी नाके मुरडत घरी जाणे पसंंत केले. सोमवार कामाचा पहिलाच दिवस. त्यामुळे प्रत्येकाची कामावर जाण्याची लगबग. पहिल्याच दिवशी पाऊस असला तरी वेळेत पोहोचू या विचाराने घराबाहेर पडलेला कल्याण, डोंबिवली, टिटवाळा परिसरातील नोकरदार सकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या दरम्यान आला. त्यावेळी त्याला लोकल अनियमित वेळेत धावत असल्याचे दिसले. सकाळी ६.१३ वाजता मुंबईला जाणारी बदलापूर लोकल डोंबिवली रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी ९.४५ वाजता आली. हेही वाचा - कारण राजकारण: शिंदे गायकवाड बेबनावामुळे पवारांचे ‘कल्याण’? अनियमित वेळेत लोकल धावत असल्याने या लोकल प्रवाशांनी तुडुंब भरून येत आहेत. त्यामुळे या लोकलने ठाणे, मुंबईपर्यंत प्रवास कसा करायचा या विचाराने प्रवासी विशेषता महिला प्रवासी सुरुवातीला कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाटावर येणाऱ्या लोकल सोडून देत होते. मागून येणारी लोकल तरी कमी गर्दीची असेल असा विचार करून सकाळी साडेसात वाजल्यापासून ते सकाळी दहा वाजेपर्यंत प्रवासी रेल्वे स्थानकांमध्ये कमी गर्दीच्या लोकलची वाट पाहत उभे होते. प्रत्येक लोकलला प्रवासी दरवाजा, लोकलमधील मधल्या सांधेजोडमध्ये उभे राहून प्रवास करत होते. रेल्वे स्थानकातच सकाळचे दहा वाजल्याने आता कार्यालयात जाऊन करणार काय. पुन्हा संध्याकाळी मुसळधार पाऊस असला तर परतीच्या प्रवासात अडकायला नको. जाणारी लोकल कुर्ला येथे अनिश्चित काळ थांबून राहिली तर काय करायचे अशा अनेक विचारांनी बहुतांशी रेल्वे प्रवाशांनी विशेषत: महिलांनी नाके मुरडत घरी जाणे पसंत केले.टिटवाळा, आसनगाव, कसारा, बदलापूरकडून येणाऱ्या अनिश्चित वेळेतील लोकल प्रवाशांची तुडुंब भरून येत असल्याने ठाकुर्ली, उल्हासनगर, विठ्ठलवाडी, डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकातील प्रवाशांना लोकलमध्ये चढणे शक्य होत नव्हते. हेही वाचा - ठाणे, पालघरमध्ये मुसळधार; कल्याण-कसारा रेल्वे वाहतूक ठप्प, प्रवाशांचे अतोनात हाल विद्यार्थ्यांची कसरत महाविद्यालयीन विद्यार्थी, शाळकरी विद्यार्थी लोकलमधील गर्दीत चढता येते का याची चाचपणी करत होते. पण त्यांचीही दमछाक होत होती. अनेक विद्यार्थी पहिल्याच दिवशी महाविद्यालयात जाता येणार नाही या विचाराने चडफडत होते. वाहनांना प्राधान्य काही दर्दी प्रवासी मात्र लोकलने प्रवास करता येणे शक्य नसल्याने आपल्या घरी असलेल्या दुचाकी काढून रस्ते मार्गाने मुंबई, नवी मुंबईत साथीदारासह प्रवास करत होते. ओला, उबर चालकांना मागणी वाढली होती. काही नोकरदारांनी आपली खासगी वाहने बाहेर काढून नोकरीच्या ठिकाणचा प्रवास सुरू केला होता. एकावेळी ही वाहने रस्त्यावर आल्याने रेतीबंदर रेल्वे फाटक, शिळफाटा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.